व्हेन्टिलेटर, बेड्स विषयांवर मनसेसह विरोधी पक्ष आक्रमक
पुणे – ‘व्हेन्टिलेटर उपलब्ध नाहीत. पन्नास हजार-एक लाख रुपये भरल्यावर लगेचच बेड मिळतो, असे का,’ असा प्रश्न महापालिका मुख्यसभेत बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यांनी विचारला; तसेच “आम्हांला सभागृहात बोलायचे आहे,’ अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. मात्र, यावर महापौरांनी राज्य सरकारच्या आदेशाचा दाखला देत बुधवारी मुख्य सभा तहकूब केली.
पीपीई किट-ऑक्सिजन मास्क परिधान करत आणि फ्लेक्स घेऊन मनसे गटनेते वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांनी मुख्यसभेत आंदोलन केले. “पैसे भरले तर व्हेन्टिलेटर मिळते. पन्नास हजार रुपये भरले नाहीत, म्हणून रुग्णाला एका खासगी रुग्णालयाने आयसीयूबाहेर काढले. एका रुग्णाच्या बिलात 59 हजार रुपये केवळ पीपीई किटचे लावले, असे धक्कादायक प्रकार घडत आहेत,’ अशी तक्रार यावेळी करण्यात आली.
“आम्हांला स्वत:ला ऑक्सिजन सिलिंडर घेऊन बाहेर पडण्याशिवाय पर्याय राहिला नाही. आम्हांला बोलू दिले जात नाही. माहिती दिली जात नाही. प्रशासनाला जाब विचारू शकत नाही. अशी स्थिती झाली आहे,’ अशी तक्रार मोरे यांनी केली.
“सत्ताधारी पळपुटी भूमिका का घेत आहेत? आज चर्चा करायचे ठरले होते. मागील मुख्यसभेत त्यांनी तसे आश्वासन दिले होते. पण, चर्चा केली जात नाही. आम्ही कधी बोलायचे,’ असा प्रश्न विशाल तांबे यांनी उपस्थित केला.
“प्रशासनाने या सगळ्या विषयांचा अहवाल द्यावा. तशा सूचना महापौरांनी आयुक्तांना कराव्यात,’ अशी सूचना दीपक मानकर यांनी केली. यावर “राज्य सरकारच्या सूचना आल्या नाहीत. अन्य सदस्यांनाही बोलायचे आहे. त्यामुळे निर्देश आल्यानंतर सगळे सदस्य असताना चर्चा करू,’ असे सांगून महापौरांनी सभा तहकूब केली.