दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल 28 मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्धघाटन केले. मात्र एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे दिल्लीतच धक्कादायक चित्र पाहायला मिळाले. संसद भवनाच्या बाहेर आंदोलन करण्यासाठी निघालेल्या कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. यानंतर पोलिसांनी कुस्तीपटूंना ताब्यात घेतले. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला. या संपूर्ण प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही संताप व्यक्त केला आहे.
शरद पवार यांनी ट्वीट करत लिहिले की, “लोकशाही मार्गाने आपल्या मागण्यांसाठी न्याय मागत असलेल्या महिला कुस्तीपटूंना दिल्ली पोलिसांनी दिलेली वागणूक अत्यंत वेदनादायक आहे. आपल्या देशाची शान असलेल्या कुस्तीपटूंना अशाप्रकारे वर्तणूक देणे आणि ताब्यात घेणे अत्यंत निषेधार्ह आहे. दिल्ली पोलिसांच्या या कृत्याचा मी तीव्र निषेध करतो. या क्रूरतेच्या कृत्याने आज आपली लोकशाही मूल्ये अपमानित झाली आहेत.”
लोकशाही मार्गाने आपल्या मागण्यांसाठी न्याय मागत असलेल्या महिला कुस्तीपटूंना दिल्ली पोलिसांनी दिलेली वागणूक अत्यंत वेदनादायक आहे. आपल्या देशाची शान असलेल्या कुस्तीपटूंना अशाप्रकारे वर्तणूक देणे आणि ताब्यात घेणे अत्यंत निषेधार्ह आहे. दिल्ली पोलिसांच्या या कृत्याचा मी तीव्र निषेध…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 28, 2023
नेमके काय घडले ?
दिल्लीतील जंतर-मंतरवर गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या कुस्तीपटूंनी नवीन संसद भवनाकडे मोर्चा वळवला. नवीन संसद भवनाकडे आगेकूच करणाऱ्या कुस्तीपटूंना पोलिसांनी अडवले. यावेळी कुस्तीपटूंनी पोलिसांचे बॅरिकेड ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अनेक पैलवानांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंना ताब्यात घेतल्यानंतर काही तासांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट यांच्यासह अन्य आंदोलक आणि आयोजकांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याशिवाय पोलिसांनी जंतर-मंतर येथील आंदोलक कुस्तीपटूंना देखील हटवले आहे.