शिरूर (प्रतिनिधी) – शिरूर तालुक्यात दिवसेंदिवस करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. तर या रुग्णांना पुण्यात नेले जात होते. त्यामुळे वेळ आणि पैसाही अधिक वाया जात होता. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी पुढाकार घेतला अन् त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याने शिरूर शहरातील स्टेट बॅंक कॉलनीजवळील मागासवर्गीय मुलींच्या हॉस्टेलमध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आता येथे शिरूर तालुक्यातील संशयिताचे नमुने घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहे.
आमदार अशोक पवार म्हणाले की, शिरूर-हवेली मतदारसंघात शिरूर, वाघोली, लोणीकाळभोर याठिकाणी केअर सेंटरला परवानगी मिळाली असून वाघोली व शिरूर येथील हे सेंटर सुरू करण्यात आले आहेत. लवकरच लोणी काळभोरचे सेंटर सुरू होईल. याठिकाणी शिरूर तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी उपचार देणार आहेत. या सेंटरमध्ये करोनाबाधित संशयित रुग्णाला आयसोलेशन क्वारंटाइन करण्यात येणार असून, काही लक्षणे दिसली तर त्यांच्यावर येथेच उपचार सुरू करण्यात येणार आहे. तर एखाद्याची प्रकृती खूपच बिघडली तर त्यास पुण्यात हलविण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
पुण्यातील रुग्णालये फुल्ल होत आहे. त्यातच ग्रामीण भागातील बाधित गेल्यास त्याचे नमुने घेण्यास व अहवाल येण्यास उशीर लागतो त्यामुळे उपचार होण्यास उशीर होऊ शकतो त्यामुळे शिरूर-हवेली मतदारसंघात तीन कोविड सेंटरला मंजूर झाले असून त्यातील दोन सुरूही झाले आहेत तसेच या सेंटरमध्ये बाधितांच्या थेट संपर्कात आलेल्या 15 जणांना क्वारंटाइन करण्यात येणार असून त्याच्यात जर लक्षणे आढळल्यास त्यांच्यावर येथेच उपचार होणार आहे, अशी माहिती शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तुषार पाटील यांनी सांगितले.