पुणे – बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातही अखेर महापालिकेने करोनाबाधितांवर उपचार सुरू केले आहेत. संकुलातील खेळाडूंच्या वसतिगृहात शुक्रवारपासून करोनाबाधित व्यक्ती उपचारासाठी पाठवण्यात आले. यामध्ये कोणतीही लक्षणे नसलेल्या पण, संसर्ग झालेल्या व्यक्तींचा समावेश आहे.
शहरातील वाढणारी करोना बाधितांची संख्या लक्षात घेऊन महापालिकेने या क्रीडा संकुलातही रुग्णांवर उपचार करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी मुलींच्या वसतीगृहामधील 2 वसतिगृहे पालिकेने ताब्यात घेतली होती. तसेच येथील बॅडमिंटन हॉलमध्येही खाटांची सुविधा उभारली आहे. त्यात हॉस्टेलची क्षमता 325 रुग्णांची असून बॅडमिंटन हॉलमध्ये सुमारे 700 खाटांची सुविधा आहे. महिनाभरापूर्वीच पालिकेने येथे रुग्ण ठेवण्याची तयारी केली आहे.