महापालिकेतील बैठकीत चर्चा; आठवडाभरात मिळणार सुविधा
पुणे – चीनमध्ये थैमान घालणाऱ्या करोना आजाराच्या संशयित रुग्णांना उपचारासाठी शहरातील 9 खासगी रुग्णालयांनी तयारी दर्शविली आहे. त्यानुसार, या रुग्णालयांना राज्यशासनाचे निकष तसेच इतर आवश्यक माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या रुग्णालयांमध्ये या आजाराच्या उपचारासाठी उभारण्यात आलेल्या विलगीकरण कक्षांची पुढील आठवड्यात तपासणी करून त्यानंतर ही माहिती राज्याच्या आरोग्य विभागास कळविण्यात येणार असल्याचे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकरे यांनी सांगितले. ही सुविधा देण्यासाठी पालिकेकडून शहरातील प्रमुख 25 हॉस्पिटलकडे विचारणा करण्यात आली होती. त्याला प्रतिसाद देत 15 हॉस्पिटलने तयारी दर्शविली होती. या हॉस्पिटलच्या प्रतिनिधींची बैठक गुरुवारी आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात आली. त्यात 9 हॉस्पिटल उपचार करण्यास तयार असल्याचे डॉ. हंकारे यांनी स्पष्ट केले.
डॉ. हंकारे म्हणाले की, या हॉस्पिटलला राज्यशासनाच्या मार्गदर्शक सूचनांची माहिती देण्यात आली आहे. त्यातील 9 रुग्णालयांनी तयारी दर्शविली असून विलगीकरण कक्ष तसेच आजार गंभीर झाल्यास त्यावर करावे लागणाऱ्या उपचारांसाठीची यंत्रणा याची माहिती घेण्यात आली. त्यानंतर, या हॉस्पिटलेचे लेखी प्रस्ताव घेऊन आरोग्य विभागाच्या पथकाकडून उपचाराच्या कक्षाची तापसणी करून या रुग्णालयांना उपचारासाठी परवानगी द्यावी म्हणून राज्यशासनाच्या आरोग्य विभागाला तातडीने कळविण्यात येणार आहे.
त्यानंतर शासनाच्या आरोग्य विभागाकडून यास मान्यता मिळताच, परदेशातून आलेल्या तसेच करोना संशयितांना या रुग्णालयांची माहिती दिली जाणार असून तिथेही उपचाराची सुविधा रुग्णाला घेता येणार आहे.