पुणे – शहरी गरीब योजनेत आता करोनावरील उपचारांचाही समावेश करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत उपचारासाठी करोनाचा रुग्ण दाखल झाल्यास त्याच्या उपचाराचा 1 लाख रुपयांपर्यंतचा खर्च केला जाणार आहे. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी ही माहिती दिली. त्यामुळे या योजनेचा लाभ घेणाऱ्या गरजूंना मोठा फायदा होणार आहे.
महापालिकेकडून आर्थिक दुर्बल घटकांमधील नागरिकांसाठी शहरी गरीब योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत 1 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न असलेल्या नागरिकांना महापालिकेने शहरात निश्चित केलेल्या पॅनेलवरील रुग्णायांमध्ये पालिकेने निश्चित केलेल्या आजारांसाठी वर्षाला 1 लाखापर्यंतचे अथवा उपचाराच्या बिलाच्या 50 टक्क्यांपर्यंत उपचार घेता येतात.
तर कॅन्सर, हृदयरोग, डायलिसिस या आजारांसाठी 2 लाख रुपयांपर्यंतचे उपचार दिले जातात. मात्र, या योजनेत आता महापालिकेने करोनाच्या रुग्णांचाही समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.