अन्य रुग्णांवर होणार डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार
पिंपरी – पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला आहे. त्यानुसार “करोना’ बाधित रूग्ण वगळता अन्य आजारांवरील रूग्णांवर उपचार करण्यासाठी डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयात व्यवस्था करण्यात आली आहे. अर्थात टप्प्या-टप्प्याने महापालिकेचे वायसीएम रुग्णालय हे पूर्णपणे “करोना’बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठीच ठेवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
टप्प्याटप्प्याने ही कार्यवाही केली जाणार आहे. वायसीएम रूग्णालयात करोना आजाराचे रूग्ण वाढल्यास अन्य आजारांचे सर्व रूग्ण डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात येणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर अन्य आजारांच्या रूग्णांची पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे होते. त्याला अनुसरून हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार ही कार्यवाही केली आहे. डॉ.डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्याशी याबाबत संवाद साधण्यात आला. त्यांनी इतर रूग्णांचे उपचार डॉ. डी. वाय. पाटील रूग्णालयात करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती वायसीएम पदव्युत्तर संस्थेचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी दिली.
डॉ. डी. वाय. पाटील रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर म्हणाले, “वायसीएम’सोबत झालेल्या सामंजस्य करारानुसार करोना बाधित वगळता अन्य आजारांवरील रूग्णांची काळजी घेण्यास आम्ही सक्षम आहोत. महापालिकेने रूग्णांची वेगवेगळी व्यवस्था करण्याचा निर्णय घेतल्याने करोनाचा संसर्ग टाळता येणार आहे.
महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयात सध्या पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर करोनाच्या रूग्णांसाठी दोन वॉर्ड तयार करण्यात आलेले आहे. चव्हाण रूग्णालयातील अन्य आजाराचे रूग्ण आम्ही टप्प्याटप्प्याने डॉ. डी. वाय. पाटील रूग्णालयात हलवित आहोत. तसेच, काही रूग्ण थेरगाव येथील आदित्य बिर्ला रूग्णालयातही हलविण्यात येत आहेत.
– श्रावण हर्डीकर, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका.