सरकारने खासगी रुग्णालय, दवाखान्यांना पुरविली नाहीत अत्यावश्यक साधने
विविध आजारांवरील शस्त्रक्रिया सुरू
वाढली मागणी : बदलत्या वातावरणामुळे रुग्णांच्या संख्येतही वाढ
पिंपरी – गेले दोन महिने “करोना’मुळे सर्व काही ठप्प झाले होते. अत्यावश्यक मानल्या जाणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रावर देखील याचा परिणाम झाला होता. अनेक शस्त्रक्रिया, उपचार पुढे ढकलण्यात आले होते. डॉक्टर देखील रुग्णांना फोनवरुन औषधे सांगत होते. रुग्णालय आणि खासगी दवाखाने उघडण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार दवाखाने उघडण्यात आले होते. परंतु अद्यापही सरकारकडून पीपीई किट उपलब्ध करुन देण्यात आले नाहीत. अनेक खासगी रुग्णालय व्यवस्थापनांनी स्वतःच हे किट विकत घेऊन काम सुरु केले आहे. तर अनेक लहान-लहान दवाखान्यांमधील डॉक्टर फक्त मास्क आणि हॅंडग्लोव्हज घालून रुग्णांना तपासत आहेत.
शहरातील रुग्णालयांमध्ये विविध आजारांवरील बंद असलेल्या शस्त्रक्रिया पूर्ववत सुरू झाल्या आहेत. तसेच गेल्या काही दिवसांमध्ये वातावरणात झालेल्या बदलांमुळे सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. “करोना’च्या आजाराची देखील हीच लक्षणे असल्याने धोकादायक स्थितीत खासगी डॉक्टरांना रुग्णांना तपासावे लागत आहे.
देशभरात 25 मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला. लॉकडाऊननंतर खासगी रुग्णालयांमध्ये करण्यात येणाऱ्या विविध शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. तसेच, काही रुग्णालयांनी बाह्यरुग्ण विभाग देखील बंद केले होते. त्याशिवाय, बरेच खासगी दवाखाने देखील बंद होते. मार्चमध्ये पीपीई किटचा तुटवडा जाणवत होता. त्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे रुग्णालये व दवाखान्यांना पीपीई कीट उपलब्ध करून देण्याची मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनचे (महाराष्ट्र) अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी राज्य सरकारकडे केली होती. मात्र, त्यानुसार पीपीई किट उपलब्ध होऊ शकले नाही.
किटमध्ये एकाच वेळी वापरता येणारे (डिस्पोजेबल) आणि स्टरलाईज करून दुसऱ्यांदा वापरता येणारे असे दोन प्रकार आहेत. डिस्पोजेबल पीपीई किट हे 350 ते 2 हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. तर, पुन्हा वापरता येणारे पीपीई कीट हे 1 हजार ते 3 हजार रुपयांपर्यंत मिळत आहेत. विविध कंपन्यांचे पीपीई किट सध्या बाजारात उपलब्ध आहेत.
सध्या शहरातील खासगी रुग्णालयांनी विविध आजारावरील शस्त्रक्रियांना सुरुवात केली आहे. एका शस्त्रक्रियेच्या वेळी शल्यविशारद, भूलतज्ज्ञ, परिचारिका, वॉर्डबाय, आया अशा चार ते पाच पीपीई किटची गरज भासते. त्यातही सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण सध्या वाढले असल्याने करोना संसर्गाची भीती जाणवते. त्यामुळे प्रतिबंधात्मक काळजी म्हणून रुग्णालयांमध्ये पीपीई किटचा वापर वाढला आहे. मोठ्या रुग्णालयांकडून हे किट विकत घेतले जात आहेत. परंतु उपनगर आणि वस्त्यांमध्ये अगदी मोजके शुल्क घेत रुग्णसेवा करणाऱ्या अनेक डॉक्टर आणि त्यांच्या स्टाफला रोजचा हा खर्च परवडणारा नसल्याचे खासगी डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. तसेच डॉक्टरांना संसर्ग होण्याच्या घटनाही शहरात घडल्या आहेत. डॉक्टरांना संसर्ग झाल्यास हा आजार झपाट्याने वाढेल, अशीही भीती व्यक्त करण्यात येत आहे.
राज्य सरकारने खासगी रुग्णालयांना पीपीई किट दिलेले नाही. अल्प दरात पीपीई किट पुरविणाऱ्या पुरवठादारांची माहिती दिली आहे. त्यानुसार रुग्णालये स्वत: पीपीई किट आणत आहेत. करोनाचा वाढता संसर्ग आणि रुग्णालयांमध्ये सुरू झालेल्या विविध आजारांवरील शस्त्रक्रिया लक्षात घेता पीपीई किटची मागणी सध्या वाढली आहे.
– डॉ. सुहास माटे, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन (पिंपरी-चिंचवड)
महापालिकेकडे दोन ते तीन महिने पुरतील एवढे पीपीई किट, एन-95 मास्क, हॅण्डग्लोव्हज आदी उपलब्ध आहे. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात सध्या केवळ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्याशिवाय, अन्य आजारांवरील रुग्णांवर उपचार करण्याची मोफत वैद्यकीय सुविधा डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाने उपलब्ध केली आहे. त्यामुळे संबंधित रुग्णालयाला महापालिकेकडून पीपीई किट पुरविण्यात येत आहेत.
– संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका.