टाकळी हाजी (शिरूर ,पुणे) – युक्रेन व रशिया या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. युद्धाच्या सहाव्या दिवशीही हवाई हल्ले सुरु आहेत. पुणे जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. यामध्ये शिरूर तालुक्यातील दहा विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेले आहेत. यामध्ये शिरूर येथील चार, टाकळी हाजी येथील चार, तर हिवरे कुंभार येथील दोन, असे एकूण दहा विद्यार्थी सध्या युक्रेन देशामधून मायदेशी परतण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. यामधील टाकळी हाजी व शिरूर येथील आठ विद्यार्थी सध्या खार्कीव्ह रेल्वेस्थानकावर पोहचले आहेत.
शिरूर तालुक्यातील आठ विद्यार्थ्यांचे पालक त्यांच्या संपर्कात आहेत. भारतात परतण्यासाठी हे विद्यार्थी आपले जीव धोक्यात घालून बाहेर पडल्याचे टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील लहू शितोळे व विलास ऊचाळे यांनी सांगितले.
शिरूर तालुक्यातील बेट भागातील काही विद्यार्थी युक्रेन मध्ये एमबीबीएस शिक्षण घेण्यासाठी गेले आहेत. परंतु काही दिवसातच युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सर्व सुविधा बंद झाल्या. अन्न पुरवठा, मोबाइल सेवा, आर्थिक सेवा कमी होत गेल्या.
यावेळी मुलांनी बाहेर पडून मायदेशी परतण्यासाठी खार्किव रेल्वस्थानकापर्यंत सात किलोमीटर पायी प्रवास करत रेल्वे स्टेशन गाठले. त्यापुढे बाराशे किलोमीटर प्रवास करत देशाच्या सीमेवर येऊन मायदेशी परतण्यासाठी प्रवासास सुरूवात केली आहे. युक्रेनमधील भारतीय दूतावास मधील अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात सीमेवरून मायदेशी पाठवण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी पालक भारतीय प्रशासनाकडे करीत आहेत.
“युक्रेनमध्ये अडकलेले शिरूर तालुक्यातील विद्यार्थ्यांचा तपशील जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडे पाठविला आहे. त्यांना मायदेशी आणण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. शिरूर हवेलीचे आमदार ऍड. अशोक पवार हे देखील विद्यार्थ्यांसाठी प्रशासनाच्या संपर्कात आहेत.”
– रंजना ढोकले, तहसीलदार शिरूर
मायदेशी परतणारे विद्यार्थी –
सुशांत लहू शितोळे, विशाल विलास उचाळे, आदित्य अर्जुन नीचित, सौरभ दादासाहेब गवारे, प्रातिक रावसाहेब मुसळे, आशिष विजय वराळ, सिद्धी फटांगडे, प्रकर्षा दुगड.