लांब पल्ल्याच्या संचलनादरम्यान जेवणासाठी ठरवून दिलेल्या हॉटेल्सना बगल
अनधिकृतपणे महागड्या हॉटेलवर थांबवत असल्याचे प्रकार समोर
पुणे – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) लांब पल्ल्याच्या संचलनादरम्यान प्रवाशांना जेवणासाठी गाड्या थांबविण्यासाठी अधिकृत हॉटेलचे थांबे ठरवून दिलेले आहेत. मात्र, काही एसटी अनधिकृतपणे महागड्या हॉटेलवर थांबवत असल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
राज्यभरात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोईसाठी महामंडळाने हॉटेल ठरवून दिलेली आहेत. या ठिकाणी संबंधित हॉटेल चालकांचा व्यवसाय होण्यासाठी सदर हॉटेल महामंडळाला ठराविक रक्कम देते. तसेच, सदर हॉटेल बसचे चालक व वाहकांना ठरवून दिलेल्या दरात जेवण, नाश्ता देते. या जेवणाचे बील वाहकाने आपल्या डेपोला जमा करणेही बंधनकारक असते. मात्र, बहुतांशवेळा अनेक एसटी महागड्या हॉटेलमध्ये थांबवत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्याच ठिकाणी जेवण करण्याशिवाय पर्यात नसतो. या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकाचे एस.टीच्या तिकिटापेक्षा जेवणाचे पैसे अधिक जात असल्याचे दिसून येते.
महागड्या हॉटेलचे दर
एसटी बस अनधिकृतपणे महागड्या हॉटेलवर थांबविल्यास प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्या ठिकाणी वडापाव 25 ते 30 रुपये, उत्तपा-इडली 50 ते 70 रुपये, चहा 15 ते 25 रुपये असे दर आकारण्यात येत असून प्रवाशांना अक्षरशः लुटले जाते. त्याशिवाय पाणी, शीतपेयांच्या बाटल्या, वेफर्स व बिस्किटाचे पुडेही दीडपट दराने विकले जातात.
मार्गावर 12 अधिकृत हॉटेल थांबे
पुणे विभागातील एसटी चालकांना मार्गावर थांबविण्यासाठी 12 ठिकाणी अधिकृत हॉटेल थांबे दिले आहेत. यामध्ये पुणे-सोलापूर मार्गावर 3 हॉटेल, सोलापूर-पुणे मार्गावर दोन, सातारा-पुणे एक, पुणे-भोर-महाड एक, पुणे-नाशिक तीन, नाशिक-पुणे एक आणि पुणे-पाटस मार्गावर एक थांबा देण्यात आला आहे.
चालक-वाहकांच्या पगारवाढीला ब्रेक
चालक-वाहकांनी अधिकृत हॉटेल व्यतिरिक्त इतर ठिकाणी एसटी थांबविल्यास त्यांची पगारवाढ तीन महिन्यांसाठी थांबविण्यात येते. तसेच, मार्गावरील अधिकृत हॉटेलच्या थांब्यावर बस थांबविणे बंधनकारक असल्याचे, एसटी प्रशासनाने सांगितले.
प्रवासादरम्यान बहुतांशीवेळा एसटी चालक महागड्या हॉटेलवर जेवणासाठी एसटी थांबवितात. यासारखे प्रकार पुणे-नाशिक व पुणे- मुंबईदरम्यान मोठ्या प्रमाणात घडतात. त्यामुळे, अशा चालक-वाहकांवर एसटी प्रशासनाने कारवाई करून प्रवाशांची लूट थांबवावी.
– संतोष परदेशी, प्रवासी