खड्ड्यांतील प्रवासामुळे शाहूपुरी मेटाकुटीला

सातारा – कण्हेर पाणीपुरवठा योजनेची नळ कनेक्‍शन व पाइपलाइनच्या कामांमुळे शाहूपुरी ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यांची दुरुस्ती लांबणीवर पडली आहे. तब्बल चाळीस लाख रुपयांची रस्ते दुरुस्तीची वर्क ऑर्डर तयार असताना केवळ पावसामुळे काम सुरू करता येत नाही, असे कारण देऊन शाहूपुरी ग्रामपंचायतीने आपले हात वर केले आहेत. त्यामुळे शाहूपुरीकरांना पुढील किमान सहा महिने तरी खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागणार आहे.

सातारा शहरालगतची मोठी ग्रामपंचायत म्हणजे शाहूपुरी. या ग्रामपंचायतीची लोकसंख्या वीस हजारांपेक्षाही जास्त आहे. ग्रामपंचायतीच्या नोंदीला साडेआठ हजार मिळकतधारक आहेत. कोटेश्‍वर पूल- अर्क शाळा नगर- पवार कॉलनीकडून शाहूपुरीच्या मुख्य चौकात येणारा रस्ता हा प्रचंड खड्डेमय झाला आहे. अंजली कॉलनी ते बोधे हॉस्पिटल या दरम्यानच्या वसाहतीच्या हद्दीचा वाद बरीच वर्ष सुरू असून सातारा पालिकेने त्यांच्या हद्दीत पंचवीस लाख रूपये कोटेश्‍वर पूल ते अर्कशाळानगर या दरम्यानच्या रस्त्यासाठी मंजूर केले आहेत. मात्र, सततच्या पावसाने काम सुरू करता येत नसल्याचा खुलासा सातारा पालिकेचे उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी केला.


शाहूपुरी व सातारा शहर यांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्याचा ताबा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असल्याचे सांगून शाहूपुरी ग्रामपंचायतीने डोळे झाकल्याने नागरिकांचा खड्ड्यांचा वनवास संपलेला नाही. गजानन महाराज मंदिर ते नामदेव झोपडपट्टी तसेच भागोजी हॉस्पिटल ते म्हसवे रस्ता, शाहूपुरीकडून दरे खुर्दकडे जाणारा रस्ता, रांगोळे कॉलनी ते माजगावकर माळ, भैरवनाथ कॉलनीसह अन्य बारा कॉलन्यांमधील अंर्तगत रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. मोठमोठी खडी वर आल्याने वाहन चालवणे दुरापास्त झाले आहे.

बुधवार नाका ते मोळाचा ओठा या रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक झाले आहे. काही ठिकाणी खडी उखडल्याने वाहन चालविण्याची कसरत करावी लागते. नामदेव झोपडपट्टीकडून बुधवार नाक्‍याकडे येणारा रस्ता प्रचंड दलदलीमुळे धोक्‍याचा बनला आहे. येथे पुलाची उंची कमी असल्याने ओढ्याचे पाणी थेट रस्त्यावर येते. छाबडा हायस्कूलकडून मोळाचा ओढा तेथून पुढे म्हसवेकडे जाणारा रस्ता तीव्र उताराचा असून दगडी वर आल्याने वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.

कण्हेर योजनेमुळे रस्ते दुरुस्तीची अडचण
शाहूपुरी ग्रामपंचायत हद्दीत कण्हेर पाणी पुरवठा योजनेचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे. या योजनेचे काम 85 टक्के काम झाल्याचे शाहूपुरी ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश आरडे यांनी “प्रभात’ ला सांगितले. मात्र, पुन्हा नळ कनेक्‍शन देण्यासाठी रस्ते खुदाई होणार असल्याने रस्ते दुरुस्तीची अडचण असल्याचे कारण सरपंच आरडे यांनी पुढे केले.

त्यामुळे शाहूपुरी हद्दीतील रस्ते दुरुस्त व्हायला आणखी किती कालावधी लागेल, ते स्पष्ट होत नाही. तब्बल साडेआठ हजार नळ कनेक्‍शन दिली जाणार आहेत. तेच काम तीन महिने चालणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र शाहूपुरीच्या हद्दीवरील कोटेश्‍वर पूल ते अर्कशाळा नगर रस्त्यांचे डांबरीकरण येत्या दोन दिवसांत सुरू होत असून पुलावर खडी येऊन पडायला सुरुवात झाल्याचे नगर अभियंता भाऊसाहेब पाटील यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.