फोटोग्राफीच्या आवडीमुळे चित्रपटनिर्मितीपर्यंत प्रवास

चित्रपट निर्मितीचे ज्ञान निर्मात्याला आवश्‍यक : राकेश राऊत

बुध  –“केवळ पैसा असला म्हणजे, निर्माता होत नाही. त्यासाठी चित्रपट निर्मितीविषयी खडान्‌खडा माहिती हवी. तरच तुम्ही चांगले निर्माता बनू शकता,” असे मत दुष्काळी खटाव तालुक्‍यातील वेटणे गावचे चित्रपट आणि टीव्ही मालिका निर्माते राकेश राऊत यांनी दै. “प्रभात’शी बोलताना व्यक्त केले. “पुसेगावचे संत सेवागिरी महाराज’, “यमाईच्या नावानं चांगभलं’ अशा चित्रपटांसह अनेक म्युझिक अल्बम तयार करणाऱ्या राकेश यांच्या कलर्स मराठी वाहिनीवरील “बाळूमामाच्या नावानं चांगभलं’, “लक्ष्मी-नारायण’ मालिकांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

चित्रपट निर्मितीकडे कसे वळलात, असे विचारले असता, राकेश म्हणाले, “”लहानपणापासून मला फोटोग्राफीची आवड होती. त्याचे पुढे व्यवसायामध्ये रूपांतर झाले. लहान वयातच मी चित्रपट आणि मालिकेसाठीची फोटोग्राफी करायला लागलो. चित्रपट आणि दूरचित्रवाणीच्या मालिकांच्या चित्रिकरणादरम्यान सेटवर अनेक निर्माते पाहिले. त्यांना मिळणारा आदर आणि सेटवरील प्राविण्य पाहता निर्माता बनावे, असे मला वाटू लागले. आपण एखाद्या माणसाकडे आकर्षित होतो.

त्याप्रमाणे माझे निर्मात्यांप्रती आकर्षण वाढले. पुढे हाच व्यवसाय करण्याचे ठरवले.” निर्माता म्हटल्यानंतर पैसे ओतणारा माणूस असे चित्र डोळ्यासमोर येत असले तरी, राकेश यांनी प्रतिकूल परिस्थितीतून इथवर मजल मारली आहे. “माझे वडील पोलीस खात्यात कामाला होते. आमचे वास्तव्य नायगाव (दादर) येथील पोलीस वसाहतींमध्ये होते. त्यामुळे आर्थिक स्थिती बेताची होती. मात्र, निर्माता बनायचेच, असे मनात ठाण मांडले. इंडस्ट्रीमध्ये असतानाच प्रोड्यूूसर व्हावे, असा ठाम निर्धार होता. मग गोष्टी घडत गेल्या. पुढे कॅमेरामन, असिस्टंट कॅमेरामन, पुढे सहदिग्दर्शक आणि दिग्दर्शक झालो. प्रॉडक्‍शन मॅनेजरसुद्धा झालो. अशा प्रकारे एकेक पाऊल पुढे टाकत पैसे जमवले आणि निर्माता झालो.”

मराठीमध्ये चांगल्या निर्मात्यांची वानवा का, यावर त्यांनी सांगितले की, मराठी चित्रपट आणि मालिका बनवणारे निर्माते हे थेट प्रोडयूसर झाले आहेत. अनेकांना फिल्ममेकिंगचा अनुभव नसतो. एखाद्या बिल्डरला फिल्म इंडस्ट्रीमधील एक डायरेक्‍टर भेटतो आणि फायनान्स करण्याची मागणी करतो. मात्र, चित्रपट कसा बनवायचा, किंवा पैसा कुठे आणि किती ओतायचा, हे ठाऊक नसते. सर्व काही दिग्दर्शकावर सोपवून तो मोकळा होतो. असे अमराठी निर्माते आपल्याकडे अनेक आहेत. दिग्दर्शकाकडून पैशाचा अपव्यय होत असल्याने, तसेच चित्रपट न चालल्याने ते दुस-या चित्रपटाच्या निर्मितीकडे वळत नाहीत. त्यामुळे मराठीमध्ये निर्माते मिळत नाहीत, अशी प्रत्येकाची खंत असते, असे त्यांनी स्पष्ट केले.

हिंदीकडेही वळणार…
मराठी मालिका आणि मराठीमध्ये चांगले हिट चित्रपट दिल्यानंतर हिंदीकडे वळेन. बॉलिवूड निर्माता बनण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. माझेही तेच स्वप्न आहे, असे राकेश यांनी सांगितले. कलर्स मराठीवर सुरू असलेल्या “बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ आणि “लक्ष्मी-नारायण’ या मालिकांचा ते सहनिर्माता आहते. संतोष आयाचित यांच्यामुळे या दोन्ही मालिकांचा भाग बनवता आले, असे त्यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)