पुणे – जेव्हा आपण प्रवासाची योजना आखतो, तेव्हा स्वतःसाठी आणि सोबत येणाऱ्या लोकांसाठी संस्मरणीय ठरेल, यासाठी आपण प्रयत्न करतो. मात्र कधी कधी सहल संस्मरणीय करण्याच्या नादात आपले बजेट कोलमडते आणि खिसा पार रिकामा होऊन जातो.
अशावेळी आपल्याला जर उत्तम आणि बजेटमधील ट्रिप काढायची असेल तर पुढील काही सोप्या टिप्सचा अवलंब केल्यास नक्कीच फायदा होईल. आणि तुम्हीही सहलीचा मनमुराद आनंद लुटू शकाल. चला तर, जाणून घेऊया या सोप्या टिप्स!
* ऑफ सिझन ट्रिप निवडा
साधारणपणे असे दिसते की लोक हिल स्टेशनला भेट देण्यासाठी खूप लोकप्रिय ठिकाणे निवडतात, जिथे त्या त्या मोसमात पर्यटकांची खूप गर्दी असते. अशा परिस्थितीत, तुम्ही ऑफ सीझन तिथे जाऊ शकता, कारण असे केल्याने तुम्हाला सर्व काही (तिकिटे, हॉटेलचे शुल्क, खाद्यपदार्थांच्या किमती, भेट देण्याच्या ठिकाणांची तिकिटे वगैरे) खूप कमी पैशात मिळतील आणि तुमचा प्रवासही स्वस्त होईल .
* हॉटेल बुक करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
फिरायला जाताना बहुतांश लोक ठराविक ठिकाणीच जातात. त्या ठिकाणी सतत पर्यटकांचा ओघ असल्यामुळे हॉटेल, लॉजची सुविधा खूप महाग मिळते. अशा परिस्थितीत तुम्ही आगाऊ हॉटेल्स ऑनलाईन बुक करा. अनेक वेबसाईट तपासल्यानंतरच हॉटेल्स बुक करा. निवडलेल्या हॉटेलचे रिव्ह्यू नक्की वाचा आणि जर तुमचा ग्रुप मोठा असेल तर तुम्ही हॉटेलवाल्यांशी कॉलवर बोलू शकता आणि त्यांच्याकडून विशेष ऑफर घेऊ शकता. असे केल्याने तुमचे खर्चही कमी होतील.
* घरचे ताजे अन्न घेऊन जा
बहुतेक लोक फिरायला जाताना वाटेत थांबतात आणि ढाबा किंवा हॉटेलमध्ये जेवण करतात. असे करण्याचे दोन तोटे आहेत. एक तर तुम्हाला भरमसाठ बिल भरावे लागेल कारण त्यांच्या अन्नपदार्थांची किंमत खूप जास्त असते आणि दुसरे म्हणजे बाहेरचे अस्वच्छ अन्न तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते. म्हणून, शक्य होईल तेवढे आपण घरातूनच भरपूर दिवस टिकतील असे खाद्यपदार्थ तयार करून घेऊन जावेत. किंवा रस्त्यात हलकेफुलके पदार्थ, फळे, बिस्कीट घ्यावेत.
* वाहन कोणते असावे ?
जिथे तुम्ही दूर अंतराच्या ठिकाणी सहलीची योजना करत असाल तर तिथे तुमचे स्वतःचे वाहन घेऊन जाण्याऐवजी बस, टॅक्सी, ट्रेन, फ्लाइट इत्यादीचा नक्की विचार करावा. जवळच्या अंतरावर सहल काढली असेल तर मग तुमचे स्वतःचे वाहन नेणे योग्य. भेट देण्याच्या ठिकाणी तुम्ही स्कूटर, बाईक इत्यादी भाड्याने घेऊ शकता.