कासारवाडी – पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रो स्थानकावरून शहराच्या विविध भागात जाण्यासाठी बसची सोय करण्यात आली आहे. मेट्रोच्या वेळेनुसार मेट्रो स्थानकावरून बस धावत आहेत. मेट्रो आणि “पीएमपी’मधून ही पूरक वाहतूक व्यवस्था सुरू करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोची दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, भोसरी (नाशिक फाटा), संत तुकाराम नगर, महापालिका भवन अशी सहा मेट्रो स्थानके आहेत. पाच स्थानकांदरम्यान मेट्रो वाहतूक सुरू झाली आहे. शहरातील विविध भागातील नागरिकांना मेट्रो सेवेचा लाभ घेता यावा. तसेच मेट्रोने प्रवास केल्यानंतर पुढील प्रवास करण्यासाठी प्रवाशांची सोय व्हावी यासाठी मेट्रो आणि पीएमपीने संयुक्तपणे एक उपक्रम सुरू केला आहे.
सध्या पिंपरी मनपा मेट्रो स्टेशन, वल्लभनगर मेट्रो स्टेशन, नाशिक फाटा मेट्रो स्टेशन, फुगेवाडी मेट्रो स्टेशनवरून बस सोडण्यात येत आहेत. मनपा भवन मेट्रो स्थानकावरून बसची पहिली फेरी सकाळी साडेसात वाजता सुरू होते. मेट्रो स्थानकाच्या खाली ही बस थांबते. मेट्रोतून उतरल्यानंतर प्रवाशांना आपल्या गंतव्य स्थळी जाण्यासाठी ही बस सोयीची आहे. दर 40 मिनिटाला बस धावत आहे. सायंकाळी 6.55 वाजता शेवटची फेरी आहे. पिंपरी-चिंचवड मनपा भवन येथून निघणारी बस आंबेडकर चौक, गांधीनगर, एचए कॉर्नर, टेल्को कंपनी, केएसबी चौक या भागातून पिंपरी मेट्रो स्थानकावर येते.
या बस फेरीला अर्धा तास लागतो. वाहतूक विस्कळीत असल्यास दहा मिनिटे अधिकची लागतात. त्यामुळे फेरीचे वेळापत्रक 40 मिनिटांचे आहे. जाधववाडी, चिखली, एच ए कॉलनी, मासुळकर कॉलनी तसेच आजूबाजूच्या परिसरातील प्रवासी बसने प्रवास करतात.
– राहुल तुरूकमारे, पीएमपी चालक
बसला अल्प प्रतिसाद
मेट्रो सेवा पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने सध्या मेट्रोतून केवळ पर्यटन सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मेट्रो आणि पीएमपीने सुरू केलेल्या बस सेवेला देखील अत्यल्प प्रतिसाद मिळतो. मात्र, मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्यानंतर या बस फेरीला देखील प्रवासी संख्या प्रतिसाद देतील. तसेच मेट्रो स्थानकावरून शहराच्या सर्व भागात जाण्यासाठी बसेस उपलब्ध नाहीत. त्यासाठी प्रवाशांना बीआरटी बस स्टॉपवर येऊन पुढील प्रवास करावा लागत आहे.