कमी अंतरावरील प्रवासासाठी अभिनव योजना
पुणे – मध्य भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी, तसेच कमी अंतरावर प्रवासासाठी पर्याय मिळावा, यासाठी पीएमपी प्रशासन सर्व पेठा, गावठाण परिसरांत दिवसभर 10 रुपयांत प्रवास करण्याची योजना राबवणार आहे. यासाठी लवकरच काही मिडी बस खरेदी करणार असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.
नागरिकांना कमी अंतरावर जाण्यासाठी अनेकदा लांब पल्ल्याच्या बसमध्ये चढावे लागते. अनेकदा या बसेस तुडुंब भरलेल्या असतात. तर काही वेळा जवळच्या अंतरावर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्यास, दूरवर जाणाऱ्या प्रवाशांना त्या बसमध्ये जागा मिळत नाही.
यामुळे पीएमपी प्रशासनाने प्रायोगिक तत्वावर दिवसभर 10 रुपयांत प्रवास करण्याची योजना आणली असून, यासाठी लवकरच झोन तयार करण्यात येणार आहेत.
दरम्यान, दि.26 जानेवारीपासून ही सेवा सुरू करण्याच्या प्रयत्न असून, यासाठी महापालिकेच्या वतीने 50 ते 60 मिडीबस खरेदी करण्यात येणार असल्याचे रासने यांनी सांगितले.