“कचरा सुका और गिला’ गाणे व्हायरल : पुणेकरांनी दिला तुफान प्रतिसाद
कचरा निर्मूलन आणि स्वच्छतेबाबत जनजागृती
कल्याणी फडके
पुणे – “काम करताना विडंबन गाणी सूचत गेली आणि मी ती म्हणत गेलो. माझ्याकडील कलेचा वापर प्रबोधनासाठी करायचा आहे,’ असे उद्गार आहेत कचरावेचक महादेव जाधव यांचे. त्यांचे “कचरा सुका और गिला’ हे गाणे शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यांच्या प्रयत्नांना नेटिझन्सनी दाद दिली आहे.
आपल्या गाण्यातून कचरा समस्येपासून तोडगा शोधण्याचा संदेश देणारे महादेव जाधव पुणेकरांना चांगलेच भावले आहेत. कसबा, विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पर्वती येथे स्वच्छता कर्मचारी असलेले महादेव यांचे शिक्षण केवळ चौथीपर्यंत झाले आहे. मात्र हे सध्या आपल्या कलेच्या माध्यमातून प्रबोधनाचे शिक्षण देत आहेत. “आता कुठे टाकू कचरा, कचरा टाकायला जागाच नाही’, “स्वच्छतेची मोहिम आली’, “अहो सांगाया तुम्हांला…सफाई सैनिक जोडीला’, “पुन्हा नका कचरा टाकू’, “साथी हाथ बढाना’ अशी कित्येक गाणी जाधव यांनी तयार केली आहेत.
“मी वेगवेगळ्या मराठी आणि हिंदी चित्रपटांतील गीतांचे विडंबन करून प्रबोधनात्मक गाणी तयार केली आहेत. “कचरामुक्त पुणे’ होण्यासाठी नागरिकांमध्ये प्रबोधन होणे आवश्यक आहे, हे प्रबोधन मी गाण्यांच्या माध्यमातून करण्याचा लहानसा प्रयत्न करत आहे. मी कोणतेही गाणे लिहीत नाही. मला सहज गाणी सुचतात. ज्या चालीमध्ये सुचेल तसे म्हणतो,’ असे जाधव सांगतात.
महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी “श्रमिक कलापथक’ आणि “पुणे मनपा सांस्कृतिक मंच’ अशा कलापथकांची सुरूवात केली आहे. मी एकटा नाही तर “आपण करू’ या उद्देशाने कलापथकांची सुरूवात केली आहे. यामध्ये अनेक वादक, गायक आहेत. आम्ही सार्वजनिक गणेश मंडळांसह विविध कार्यक्रमांमध्ये, शाळांमध्ये आजपर्यंत सुमारे 30 ते 40 ठिकाणी पथनाट्ये सादर केली आहेत. शालेय विद्यार्थ्यांना देखील या माध्यमातून चांगला संदेश मिळतो, अशी भावना जाधव यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना व्यक्त केली.
…असे सुचले पहिले गाणे
लहानपणापासूनच गाण्यांची आवड आहे. कविता तयार केल्या, त्यांना चाल दिली. त्यानंतर कालांतराने प्रबोधनात्मक आणि विशिष्ट विषयाला धरून गाणी तयार केली. सन 2007 मध्ये कचरा प्रश्नाबाबत एक बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये मी सफाई सेवक म्हणून बसलो होतो. अचानक मला तेथे “अहो, सांगाया तुम्हांला… सफाई सैनिक जोडीला’ हे गाणे सुचले. यानंतर माझी गाणी “हिट’ झाली, असे महादेव यांनी सांगितले.
पुणेकरांकडून चांगली दाद
माझे गाणे ऐकणारा प्रत्येक जण मला दाद देतो. “जाधव काका, गाणं चांगलं होतं’, असे आवर्जुन सांगतात. अनेकांनी पुणे महापालिकेमध्ये अभिप्राय लिहिताना माझा उल्लेख “गायक’ असा केला आहे, ही समाधानकारक बाब आहे.
ही आहे “व्हायरल’ गाण्याची गोष्ट
“यशदामध्ये एका सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मी त्या सेमिनारला गेलो होतो. अजूनही आठवते, तेथे विविध राज्यांतील “कचरा व्यवस्थापन’ विषयावर काम करणारे अधिकारी आले होते. त्यांच्या बोलण्यामध्ये ओला, सुका कचरा वेगळा करावा, कॅरिबॅगचा वापर करू नये आदी विषयांवर चर्चा झाली. अनेक जण हिंदीत बोलले होते. त्यामुळे “कचरा सुका और गिला’ हे गाणे सुचले. तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत माझ्या या गाण्याचे रेकॉर्डिंग सुद्धा झाले होते,’ असे महादेव म्हणाले.
ही आहे “व्हायरल’ गाण्याची गोष्ट
“यशदामध्ये एका सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मी त्या सेमिनारला गेलो होतो. अजूनही आठवते, तेथे विविध राज्यांतील “कचरा व्यवस्थापन’ विषयावर काम करणारे अधिकारी आले होते. त्यांच्या बोलण्यामध्ये ओला, सुका कचरा वेगळा करावा, कॅरिबॅगचा वापर करू नये आदी विषयांवर चर्चा झाली. अनेक जण हिंदीत बोलले होते. त्यामुळे “कचरा सुका और गिला’ हे गाणे सुचले. तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत माझ्या या गाण्याचे रेकॉर्डिंग सुद्धा झाले होते,’ असे महादेव म्हणाले.