गाडीवर प्रेस लावून गांजाची वाहतूक; दोघांना अटक

पुणे – पोलिसांना संशय येऊ नये म्हणून गाडीवर प्रेस लिहून गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 37 किलो 200 ग्रॅम वजनाचा साडेनऊ लाखाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई विमाननगर परिसरात करण्यात आली. गांजाची वाहतूक करणारे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

रविंद्र योसेफ आढाव (23 रा. नगर), गोरक्षनाथ लक्ष्मण दहातोंडे (41 , रा. नगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी गुन्हे शाखेचे अधिकारी, कर्मचारी विमाननगर परिसरात पेट्रोलिंग करीत होते. यावेळी कमिंन्स इंडिया कंपनीच्या गेटजवळ एक चारचाकी गाडी संशयास्पदरित्या थांबली होती.या गाडीची तपासणी केली असता त्यांना दोन गोण्यांमध्ये 37 किलो 200 ग्रॅम गांजा आढळला.

या गांजाची किंमत साडेनऊ लाख रुपये इतकी आहे. आरोपींनी गांजाची वाहतूक करणारी गाडी पोलिसांनी पकडू नये तसेच कुणाला संशय येऊ नये, यासाठी गाडीच्या काचेवर प्रेसचे स्टिकर लावले होते. तसेच निळा प्रहार स्पेशल फोरम तालुका अध्यक्ष या नावाचे स्टिकर ही गाडीवर लावण्यात आले होते. पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही आरोपींविरोधात नगरमधील सोनई पोलीस स्टेशनमध्ये दारूविक्रीचा गुन्हा दाखल आहे.

ही कारवाई युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक सुनिल ताकवले, उप निरीक्षक सुनिल कुलकर्णी, संजय गायकवाड, हनुमंत शिंदे, पोलिस अंमलदार सचिन जाधव, इम्रान शेख, प्रशांत गायकवाड, महेश बामगुडे, अय्याज दड्डीकर, तुषार माळवदकर यांच्या पथकाने केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.