पोलीस आयुक्तांचे आदेश : समस्या शोधून, त्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न
पुणे – “स्मार्ट सिटी’ पुण्यातील ही वाहतूक कोंडीची समस्या येत्या काळात केवळ वाहतूक विभागापुरती मर्यादित राहणार नाही. तर, या समस्येवर तोडगा काढण्यासाठी स्थानिक पोलीस स्टेशनदेखील सक्रीय सहभागी होणार आहेत.
शहरातील वाहतूक सुलभ व्हावी, यासाठी वाहतूक शाखा आणि पोलीस स्टेशनच्या समन्वयातून कार्यवाही करण्यात येणार आहे. प्रत्येक परिमंडळातील समस्या शोधून, त्यावर तोडगा काढण्यात येणार आहे. याद्वारे शहरातील एकूण पाच परिमंडळांच्या 150 समस्यांवर तोडगा काढण्यात येणार आहे, असे माहिती पोलीस सह आयुक्त रवींद्र शिसवे यांनी दिली.
वाहनांची वाढत्या संख्येमुळे बऱ्याच वेळा वाहतूक व्यवस्थेवर ताण येऊन वाहतुकीची कोंडी होते. यासह शहरामध्ये रस्त्यांची रुंदी कमी असणे, बाजारपेठांच्या ठिकाणी वाहनतळ नसणे, वाहनतळांचा वापर न होणे, फुटपाथ नसणे आदी समस्या आहेत. या समस्यांवर उपाय शोधून वाहतूक सुलभ करणे आवश्यक आहे. त्यामुळे पुणे शहरात 30 पोलीस स्टेशन असून वाहतुकीच्या काही समस्या शोधून त्यावर उपाय शोधण्यासाठी संबंधित भागातील वाहतूक विभाग आणि पोलीस ठाणे यांच्या समन्वयातून मार्ग काढण्याचे काम मागील एक महिन्यापासून पोलीस आयुक्तांच्या आदेशाने सुरू केले आहे.
यामध्ये संबंधित पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेण्यात येत असून, प्रत्येक भागातील सर्व्हेक्षण केले आहे. यामध्ये आढळून आलेल्या 5 समस्या निश्चित केल्या असून, त्यावर उपाय शोधण्यात येत आहेत. समन्वयामध्ये सुसूत्रता यावी, यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त आणि परिमंडळ पोलीस उपायुक्त यांच्यामध्ये समन्वय राहण्यासाठी पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त वाहतूक शाखेचे प्रमुख पर्यवेक्षक आणि नियंत्रक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. तर वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांकडे प्रमुख जबाबदारी असणार आहे, अशी माहिती कार्यालयाकडून देण्यात आली. आता यावर प्रत्यक्ष कार्यवाही कधी होते, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
प्रसाद अक्कनौरू नवे उपायुक्त
वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांची परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कनौरू वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.