पिंपरी (प्रतिनिधी) – संपूर्ण शहरात संचारबंदी असतानाही दारू आणि गुटख्याची तस्करी सुरूच असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. बुधवारीही (दि. 8) याबाबत सांगवीमध्ये दोन तर भोसरीमध्ये एक अशा एकूण तीन गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
पहिल्या घटनेत भोलाराम जयराम चौधरी (वय 31, रा. श्रीकृष्णनगर, पिंपळे गुरव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. राजेंद्र रघुनाथ काकडे (वय 52) यांनी याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काकडे हे शासनाच्या अन्न व औषध प्रशासनामध्ये अन्न निरीक्षक या पदावर कार्यरत आहे. पोसिलांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला गुटख्याच्या तस्करीबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार बुधवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास काकडे यांनी खात्री केली असता आरोपीकडे सरकारने प्रतिबंधित केलेला 63 हजार 866 रुपयांचा गुटखा मिळून आला. पोलीस उपनिरीक्षक साळुंके याबाबत अधिक तपास करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत तेजस ऊर्फ सागर संजय गायकवाड (वय 24, रा. कमलाबाई बहिरट चाळ, दापोडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी प्रविण अशोक शिंदे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तेजस गायकवाड हा बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास आपल्या एमएच-14-इएस-9732 या दुचाकीवरून चालला होता. बोपोडी दापोडी रोडवरील मयुर वाटिका सोसायटीसमोर त्यांची दुचाकी पोलिसांनी अडवून विचारपूस केली असता त्यांने उडवा उडवीची उत्तरे दिली. यामुळे पोलिसांनी त्याची दुचाकीची पाहणी केली असता त्यामध्ये 300 रुपयांच्या तीन लिटर गावठी दारूच्या पिशव्या आढळून आल्या. यामुळे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक साबळे याबाबत अधिक तपास करीत आहेत.
तिसऱ्या घटनेत महादेव बैजप्पा चनाले (वय 31, रा. भालेकर नगर, पिंपळे गुरव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकातील कर्मचारी दादा रमेश धस (वय 32) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महादेव चनाले हा दारू विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार बुधवारी (दि. 8) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास भालेकर नगर, पिंपळे गुरव येथील मैफिल हॉटेलबाहेरील मैफिल पान टपरीवर छापा घातला. त्यावेळी आरोपी चनाले याच्याकडे 74 हजार 125 रुपयांचे विदेशी मद्य व बिअरच्या बाटल्या विक्री करीत असताना मिळून आला. यामुळे चनालेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक साळुंके याबाबत अधिक तपास करीत आहेत.