पारदर्शकतेचा टेंभा मिरवण्याऱ्या सरकारचा बुरखा फाटल्याशिवाय राहणार नाही- कोल्हे

अहेरी आणि गडचिरोली या दोन्ही जागा लढवण्यासाठी ताकदीने उभे राहूया – आ. जयंत पाटील

गडचिरोली:शिवस्वराज्य यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यातील पहिली सभा गडचिरोली येथे पार पडली. यावेळीराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. अमोल कोल्हे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर तसेच प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी सभेत उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित केले.

गडचिरोली भागातील शासकीय जागा रिक्त आहेत. त्यामुळे पारदर्शकतेचा टेंभा मिरवण्याऱ्या सरकारचा बुरखा फाटल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका खा. अमोल कोल्हे यांनी केली. छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले भाडेतत्त्वावर देणाऱ्या फडणवीस सरकारने रंकाचा राव होतो तसा रावाचा रंक व्हायला वेळ लागत नाही हे विसरु नये, असेही कोल्हे म्हणाले.

आपल्याला येणाऱ्या विधानसभेला अहेरी आणि गडचिरोली अशा दोन जागा लढवायच्या आहेत. या भागात ताकदीने उभे राहण्याची गरज आहे, असे आवाहन आ. जय़ंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले. तसेच पूरग्रस्त भागात परिस्थिती जाणून घेण्यासाठी हे फडणवीस सरकार आले नाही. पण राष्ट्रवादी पक्ष भामरागड व अहेरी या भागाला मदत देण्याचे काम करेल, असा विश्वास त्यांनी दिला.

विदर्भाची स्वाभिमानाशी ओळख करुन द्यायला ही शिवस्वराज्य यात्रा आली आहे, असे महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी सांगितले. मुख्यमंत्रीपद विदर्भाला मिळाले तरी हा स्वाभिमान दिल्लीपुढे झुकला, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भातील असूनही शेतकरी,महिला, युवक, विद्यार्थी या सर्व घटकांचे प्रश्न मार्गी लागलेले नाहीत, अशी आठवण करून दिली.

प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी देखील सरकारच्या कारभाराचा खरपूस समाचार घेतला. या भाजपा सरकारने संविधान जाळण्याचे सर्वात मोठे पाप केले आहे. राज्यातील प्रमुख मंत्री तसेच मुख्यमंत्री विदर्भातले असूनही सरकारने या भागासाठी दिलेली सर्व आश्वासने खोटी ठरली असल्याचे त्यांनी सांगितले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.