पुणे – मेट्रोच्या कामामुळे शिवाजीनगर एसटी स्थानकाचे वाकडेवाडी स्थानकात स्थलांतर झाले आहे. या पार्श्वभूमीवर एसटीच्या अधिकाऱ्यांनी वाकडेवाडी स्थानकातील कामाची पाहणी केली.
वाकडेवाडी स्थानकातून सोमवारी काही एसटी बसचे संचलन सुरू झाले असून मंगळवारपासून शिवाजीनगर स्थानकाचे संपूर्ण संचलन वाकडेवाडी आगारातून होणार आहे. वाकडेवाडी स्थानकात अद्यापही किरकोळ स्वरूपाची कामे सुरू असून या कामाचा आढावा पुणे विभागाच्या वाहतूक नियंत्रक व इतर अधिकाऱ्यांनी घेतला. यावेळी नवीन आगारातील काही कामांसंबंधी सूचना करण्यात आल्या आहेत. वाकडेवाडी स्थानकातून काही गाड्यांचे संचलन सोमवारपासून सुरू केले आहे. तसेच, नवीन आगारातून सुटणाऱ्या बसेसचे संचलन सुरळीत होण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत.