बीड – गेल्या काही दिवसांपासून बीडमधील तृतीयपंथी सपना आणि ढोलकी वादक बाळू यांच्या अनोख्या प्रेमकहाणीची सर्वत्र चर्चा सुरु होती. अखेर दोघे आज लग्नबंधनात अडकले आहेत. बीडमधील कंकालेश्वर मंदिरात सपना आणि बाळूचा पारंपारिक धार्मिक विधीनुसार मोठ्या धुमधडाक्यात विवाह सोहळा पार पडला. संपूर्ण मंगलाष्टिका झाल्यानंतर बीडमधील पत्रकार आणि सामाजिक संस्थेमधील लोकांनी सपनाचे कन्यादान केले. गेल्या दोन वर्षांपासून ते प्रेमसंबंधात होते.
सपना आणि बाळूच्या प्रेम कहाणीचे राज्यभरातून कौतुक होत आहे. सपनाने तिच्या आयुष्यामध्ये कधीही तिला हळद लागेल असे स्वप्न बघितले नव्हते. परंतु, बाळूच्या साथीने काल सपनाला हळद लागली आणि आज ती बहोल्यावर चढली. आज सकाळी साडेअकरा वाजता सपना- बाळू विवाह बंधनात अडकले आहेत.
बाळू तोडमल हा तरूण जागरण गोंधळाच्या कार्यक्रमामध्ये ढोलकी वाजवण्याचे काम करतो. अशाच एका जागरण-गोंधळाच्या कार्यक्रमादरम्यान तृतीयपंथीय सपनाशी बाळूची भेट झाली होती. एके दिवशी कार्यक्रम संपवून बाळू आणि सपना बीडमध्ये पोहोचले. बाळूला गावाकडे जाण्यासाठी रात्री उशिरा गाडी नव्हती. त्यामुळे तो सपना सोबतच थांबला आणि येथूनच त्यांच्या अनोख्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली. जीवीपाड प्रेम करणारे बाळू आणि सपना आता आयुष्यभरासाठी एकमेकांचे सोबती बनले आहेत.