पर्यटक, स्थानिक व्यावसायिकांसह पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला
लोणावळा – पर्यटकांचे आकर्षक स्थळ असलेल्या भुशी धरणावर गुरुवारी (दि. 1) दोन तृतीयपंथीयांनी चांगलाच उच्छाद मांडला. विवस्त्र होत अश्लील हावभाव करीत धरणावर वर्षाविहारासाठी आलेल्या अन्य पर्यटकांना त्रास दिला. या तृतीयपंथीयांनी रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर तसेच नागरिकांवर हल्ला करीत धरण परिसरात मोठा गोंधळ घातला. अश्विनी शिरसाट व आम्रपाली शिंदे (दोघी रा. चिंचवडेनगर, चिंचवड, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तृतीयपंथीयांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुशी धरणावर गुरुवारी (दि. 1) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास भुशी धरणावर फिरायला आलेल्या दोन तृतीयपंथीयांनी धरणाच्या पायऱ्यांवर गोंधळ घातला. दारूच्या नशेत स्वतःच्या अंगावरील पूर्ण कपडे काढून अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. त्यामुळे मुली, महिला पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागला. हा सर्व प्रकार सुरू असताना त्याठिकाणी बंदोबस्ताला असलेले पोलीस शिपाई प्रकाश झेंडे, मुंडे आणि होमगार्ड अक्षय कोकाटे यांनी या दोन्ही तृतीयपंथीयांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी अश्लिल वर्तन करीत त्यांनाच मारहाण केली.
यानंतरही या तृतीयपंथीयांनी रस्त्यावर आरडाओरडा करीत नाचत, शिविगाळ करीत होते. या दरम्यान त्यांनी स्थानिक व्यावसायिकांवर तसेच नागरिकांवर देखील धावून जाण्याचा व मारहानीचा प्रयत्न केला. शेवटी त्यांना धरणावरून पोलिसांनी मुख्य रस्त्यावर आणले. मात्र याठिकाणी देखील पूर्ण नग्न होत या दोन तृतीयपंथीयांनी रस्त्यावर आडवे झोपत ये-जा करणाऱ्या वाहनांना आडकाठी करीत नागरिक तसेच पोलिसांना पुन्हा मारहाण केली. लोणावळा शहर पोलिसांनी या दोन्ही तृतीयपंथी विरोधात सरकारी कामात अडथळा, मारहाण आणि शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.