पुण्यातील शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या

पुणे – राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने एकाच विभागात तीन वर्षांपेक्षा जास्त काळ तळ ठोकणाऱ्या पुण्यातील विविध शिक्षण विभागांतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका लावला आहे. सोयीच्या ठिकाणी बदली न झालेल्या अधिकाऱ्यांनी ती रद्द करण्यासाठी मुंबई मंत्रालय वारीही सुरू केली आहे.

एकाच विभागात एकाच पदावर अनेक वर्षे कार्यरत अधिकाऱ्यांची मक्‍तेदारी मोडून काढण्यासाठी शासनाकडून विविध कारणे दाखवून दरवर्षी बदल्या करण्यात येतात. यंदाच्या बदल्यांचा हंगामाला मुहूर्त सापडला आहे. नागरी सेवा मंडळाने सामान्य प्रशासन विभागाच्या समुपदेशनाद्वारे बदल्या करण्यासंदर्भात सन 2018 मध्ये मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. यात बदलीपात्र अधिकाऱ्यांच्या बदलीसंदर्भात शिफारशी केलेल्या आहेत. त्यानुसार अधिकाऱ्यांना पदस्थापना देण्यात आली आहे. प्रशासकीयसह इतरही कारणांनी अधिकाऱ्यांच्या बदल्या केलेल्या आहेत, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. शासनाचे कार्यासन अधिकारी संतोष ममदापुरे यांनी बदल्यांचे आदेश नुकतेच जारी केले.

पुण्यातील शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सहायक शिक्षण संचालक मीनाक्षी राऊत यांची पुणे महापालिकेत शिक्षणाधिकारी पदावर प्रतिनियुक्‍तीने रिक्‍तपदावर बदली केली आहे. कनिष्ठ प्रशासन अधिकारी भारत बोरनारे यांची मुंबई येथील माध्यमिकच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाच्या अधीक्षकपदी पदस्थापना दिली आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतील अधीक्षक प्रविण गायकवाड यांची बीड येथील माध्यमिकच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाच्या अधीक्षकपदी बदली झाली आहे. परीक्षा परिषदेतील अधीक्षक गणेश खाडे यांची पुणे येथील प्राथमिक शिक्षण संचालनालयातील अधीक्षकपदी बदली झाली आहे. शिक्षण आयुक्‍त कार्यालयातील अधीक्षक कृष्णा ढाळे यांची परभणी येथील प्राथमिकच्या वेतन व भविष्य निर्वाह निधीच्या अधीक्षकपदी बदली झाली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालयातील वासुदेव भुसे यांची सांगलीच्या प्राथमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाच्या अधीक्षकपदी बदली झाली आहे.

पुणे जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य कमला आवटे यांची ठाणे येथे विकास संस्थेच्या प्राचार्यपदी बदली झाली आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील संगिता शिंदे यांची बारामती पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदावर बदली झाली आहे.

जिल्हा परिषदेतील माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी धनाजी बुट्टे यांची जिल्हा परिषदेत नवनाथ वणवे यांच्या जागी प्राथमिक उपशिक्षणाधिकारी पदावर बदली झाली आहे. तर वणवे यांची दौंड पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे. पुरंदर येथील पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांची ठाणे येथे शहापूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदावर बदली झाली आहे. माध्यमिक विभागातील उपशिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांची भोरच्या पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारीपदी बदली झाली आहे.

अधिकाऱ्यांनी त्यांच्या नवीन पदांचा पदभार त्वरीत स्वीकारावा. अनधिकृतपणे रजेवर जाऊ नये. बदली रद्द करण्यासाठी कोणत्याही स्वरुपाचे प्रयत्न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे, असा इशाराही शासनाने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)