वाद टाळण्यासाठी क्षेत्रीय कार्यालय हद्दीतच बदल्या
पुणे – महापालिकेच्या शिक्षण विभागात तब्बल चार वर्षांनंतर बदल्या होणार आहेत. मात्र, बदल्यांमुळे होणारे वाद टाळण्यासाठी प्रशासनाने यंदा बदल्या करताना, सध्या असलेल्या क्षेत्रीय कार्यालयाच्या शाळांमध्येच बदल्या करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या सर्व शाळा 15 जूनपासून सुरू होत असून शाळा सुरू होताच प्रत्येकी 20 टक्के शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत.
महापालिका शिक्षण मंडळाच्या जवळपास तीनशेच्या जवळपास शाळा आहेत. या शाळांमधील शिक्षकांची संख्या 2 हजार 200 इतकी असून शिपाई आणि रखवालदार यांची संख्या 1 हजार इतकी आहे. महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे या शिक्षकांच्या दर तीन वर्षांनी बदल्या होणे अपेक्षित आहे. मात्र, जवळपास गेल्या तीन ते चार वर्षांपासून बदल्या झालेल्या नाहीत. त्यातच अनेक शिक्षक, शिपाई आणि रखवालदार वर्षानुवर्षे एकाच शाळेत ठाण मांडून आहेत. त्यामुळे यावर्षीच्या शैक्षणिक वर्षात यासर्व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे प्रशासनाने निश्चित केले आहे. मात्र, साधारण चार वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या बदल्यांमध्ये अनेक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या शहराच्या एका टोकावरून थेट दुसऱ्या टोकाला बदल्या करण्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे या बदल्या वादग्रस्त ठरल्या होत्या. तसेच, या बदल्या सलग दोन वर्षे रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली होती. ही बाब लक्षात घेऊन यंदा बदल्यांबाबत वाद होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात येणार असल्याचे प्रशासकीय सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.