सातारा, (प्रतिनिधी) – सातारा पालिकेच्या बांधकाम विभागाचे क श्रेणीतील अभियंता सुधीर चव्हाण व अनंत प्रभुणे यांची बदली करण्यात आली आहे. चव्हाण यांची बदली कराड नगरपालिकेत तर प्रभुणे यांची बदली वाई नगरपालिकेत करण्यात आली आहे.
नगरपरिषद संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक मनोज रानडे यांनी महाराष्ट्रातल्या 32 नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या बदल्याचे खास बाब म्हणून बदलीचे आदेश जाहीर केले.
विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते तत्पूर्वी नगर परिषद संचालनालयाने संबंधित कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शुक्रवारी या बदलांचे आदेश सातारा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले.
सुधीर चव्हाण व अनंत प्रभुणे हे बांधकाम विभागाचे जबाबदार अभियंता होते 1996 पासून ते करार तत्त्वावर पालिकेमध्ये सक्रिय होते. काही वर्षांपूर्वी राज्यसंवर्गात त्यांचा समावेश करण्यात आला.
त्यांच्या सेवेची सातारा पालिकेतील तीन वर्षे पूर्ण झाल्याने त्यांची बदली करण्यात आली आहे. बांधकाम विभागात त्यांच्याकडील कामांच्या जबाबदारीतून त्यांना मुक्त करण्यात आले आहे.
अशी माहिती बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता शहाजी वाठारे यांनी दिली. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ संबंधित ठिकाणी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.