सिंधुदुर्ग : छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. विरोधकांनी हा मुद्दा मोठ्या प्रमाणात लावून धरला होता. या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी घडलेल्या घटनेबाबत महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेची माफी मागितली. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी पालघर दौऱ्यासाठी आले असता त्यांनीही सिंधुदुर्घमधील घटनेबद्दल महाराष्ट्राची व शिवभक्तांची माफी मागितली होती. मात्र तरीदेखील महाविकास आघाडीकडून या घटनेच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची तडकाफडकी बदली
या घटनेनंतर सरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची तडकाफडकी बदली केली आहे. तर त्यांच्या जागी हाफकिनचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील यांची सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर किशोर तावडे यांच्यावर महाराष्ट्र राज्य फार्मिंग कार्पोरेशन पुणेच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
किशोर तावडे यांनी 23 ऑगस्ट 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यांच्या कालावधीत भारतीय नौसेना दिन मालवण मध्ये साजरा करण्यात आला होता. तसेच राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ही बांधण्यात आला होता. मात्र छत्रपतींचा हा पुतळा अगदी पावणे नऊ महिन्यातच कोसळला होता. त्याचा वादंग अद्यापही संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे.