कोल्हापूर – कळंबा कारागृहात 10 मोबाईल व गांजा आढळून आल्यानंतर कारागृह अधीक्षक शरद शेळके यांची तडकाफडकी येरवडा कारागृहाला बदली करण्यात आली आहे. त्यांचा पदभार येरवडा येथील चंद्रमणी इंदूरकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
याबाबतचे आदेश अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी दिले. याप्रकरणाच्या चौकशीसाठी खुद्द रामानंद हे आज कोल्हापुरात आले होते. दीड महिन्यापूर्वी तिघा संशयितांनी चेंडू कापून त्यात गांजा भरला होता. ते तीन चेंडू ते कळंबा मध्यवर्ती कारागृहात फेकण्याच्या तयारीत होते.
त्यापूर्वीच जुना राजवाडा पोलिसांनी त्या तिघांवर कारवाई केली. दरम्यान, कळंबा मध्यवर्ती कारागृहात मंगळवारी मध्यरात्री मोटारीतून आलेल्या दोघा अज्ञातांनी कपड्याची तीन पुडकी फेकली. त्यात पाऊण किलो गांजा, 10 मोबाईल, दोन पेन ड्राईव्ह, चार चार्जर कॉड आणि चिकटविण्यासाठी वापरण्यात येणारे मिश्रण होते.
एकाच वेळी कळंबा कारागृहात दहा मोबाईल पोहचविण्याचा झालेल्या प्रयत्नांची गंभीर दखल कारागृह प्रशासनाने घेतली. संपूर्ण कारागृहाची तपासणी करून याच्या मुळापर्यंत जाऊन तपास करण्याचे आदेशही वरिष्ठ पातळीवर प्रशासनाला देण्यात आले आहेत.