निकालावेळीच “ट्रान्सक्रिप्ट’ देण्यावर शिक्‍कामोर्तब

पुणे विद्यापीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय


मार्च 2020 मध्ये होणाऱ्या परीक्षांपासून अंमलबजावणी


पहिल्या टप्प्यात सध्या अभियांत्रिकी विद्याशाखेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार प्रमाणपत्र

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आता निकालाबरोबरच “ट्रान्सक्रिप्ट’ प्रमाणपत्र देण्याचा महत्त्वपूर्ण घेतला आहे. पहिल्या टप्प्यात सध्या अभियांत्रिकी विद्याशाखेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र निकालासोबतच दिले जाणार असून, त्याची अंमलबजावणी येत्या मार्च 2020 मध्ये होणाऱ्या परीक्षांपासून होणार आहे.

परदेशी विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी अर्ज करण्यापासून ते अगदी नोकरीच्या मुलाखतीवेळी पदवी शिक्षणातील सर्व वर्षांचा निकाल एकत्रित सारांश असणारे प्रमाणपत्र म्हणजे “ट्रान्सक्रिप्ट’ होय. हे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना निकालाबरोबरच मिळणार असल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसाय टळणार आहे. एवढेच नव्हे, तर या प्रमाणपत्रासाठी विद्यापीठाकडे आता हेलपाटे मारावे लागणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.

परदेशात शिक्षण असो अथवा कंपन्यांमध्ये नोकरीसाठी “ट्रान्सक्रिप्ट’ प्रमाणपत्र आवश्‍यक आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे विद्यार्थी मोठ्या संख्येने अर्ज करतात. अर्ज केल्यावर 15 दिवसांमध्ये प्रमाणपत्र मिळणे अपेक्षित आहे. मात्र, हे प्रमाणपत्र मिळण्यास बरीच प्रतीक्षा करावी लागते. त्या पार्श्‍वभूमीवर कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी निकालावेळीत विद्यार्थ्यांना “ट्रान्सक्रिप्ट’ प्रमाणपत्र मिळण्यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. संजय चाकणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती.

गेल्या 15 दिवसांपूर्वी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निकालाबरोबरच “ट्रान्सक्रिप्ट’ प्रमाणपत्र देण्याबाबत चर्चा झाली. त्यात विद्यार्थ्यांना निकालाबरोबर हे प्रमाणपत्र देण्यावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले. मात्र, सर्व विद्याशाखांसाठी नव्हे, तर पहिल्यांदा अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व विद्याशाखांसाठी हा निर्णय लागू केला जाणार असल्याची माहिती या समितीचे अध्यक्ष व व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संजय चाकणे यांनी दिली.

विद्यापीठातून दरवर्षी अभियांत्रिकी शाखेचे सुमारे 40 हजार विद्यार्थी उत्तीर्ण होतात. अभियांत्रिकीच्या परीक्षा मे-जून या महिन्यात होत आहे. त्यासाठी मार्च 2020 पासून परीक्षा अर्ज करावे लागते. त्यात अर्ज करतानाच “ट्रान्सक्रिप्ट’ प्रमाणपत्र हवे की नको, असा पर्याय असेल. त्यानुसार इच्छुक विद्यार्थ्यांना निकालाबरोबरच हे प्रमाणपत्र अभियांत्रिकीचा निकाल लागताच देण्यात येणार आहे.

विद्यापीठाच्या कार्याची महती कळू शकणार
आता निकालासोबत “ट्रान्सक्रिप्ट’ प्रमाणपत्र देत असताना त्यात पुणे विद्यापीठाने मिळविलेले नॅक, स्वायत्तता, शैक्षणिक गुणवत्तेत उल्लेखनीय कामगिरी या गोष्टींचा थोडक्‍यात उल्लेख केला जाणार आहे. त्यामुळे देश-विदेशात “ट्रान्सक्रिप्ट’ प्रमाणपत्र पाहत असताना त्यात विद्यापीठाच्या कार्याची महती कळू शकणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.