मेढ्यात नगरपंचायतीच्या आदेशांची पायमल्ली

निष्काळजीपणा वाढल्याने जबाबदारीही वाढली; पोलिसांचा बंदोबस्तही सैल

मेढा  (प्रतिनिधी) – कंटेनमेंट झोनमध्ये असणाऱ्या मेढा शहरात काही काही अटी शिथिल करुन बाजारपेठ सुरळीत करण्यात आली आहे. तसेच गर्दी होऊ नये यासाठी मेढा नगरपंचायतीने व्यापाऱ्यांना सम आणि विषम तारखेला दुकान उघडण्याच्या सुचना केल्या आहेत. परंतु, व्यापाऱ्यांकडून प्रशासनाचा आदेश पायदळी तुडवला जात असून दररोज दुकाने उघडी ठेवली जात आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सोशस डिस्टन्सिंगचे नियमचे पाळले जात नाहीत.

पहिल्या टप्प्यात सातारा जिल्ह्यात सर्वात जास्त 49 हजार मुंबईकर जावळीत दाखल झाले होते. दुसऱ्या टप्प्यात ही संख्या आणखी वाढल्याने प्रशासनाची जबाबदारीही वाढली आहे. मात्र, प्रशासनाने मआता निष्काळजीपणा करण्यास सुरुवात केली आहे. सध्याच्या घडीला जावळी तालुका करोना मुक्त झाला असला तरी 20 हजार मुंबईकर नव्याने जावळी तालुक्यात दाखल झाले आहे. राज्यात सगळ्यात जास्त करोनाचा प्रसार मुंबई पुणेकरांकडून होत असताना अनेक गावांमध्ये ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी स्वखर्चाने गावाच्या बाहेर किंवा शाळांमध्ये परगावाहून येणाऱ्यांना क्वारनटाइन केले आहे. मात्र मेढा नगपंचायतीने मुंबईहून येणाऱ्यांना घरीच क्वारानटाइन होण्याचे आदेश दिले आहेत. यामध्येही क्वारनटाइनचे शिक्के असणारे लोक बाहेर फिरताना आढळत आहेत. नगरपंचायतीकडे याबाबत तक्रार केल्यानंतरही त्यांच्यावर ठोस कारवाई होताना दिसत नाही.

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काही भागात लॉकडॉऊनच्या अटी शिथिल करून बाजारपेठा उघडण्याची मुभा दिली. यानंतर मेढा नगरपंचायतीने दुकानदारांची यादी तयार करून दुकानदारांना सम आणि विषम तारखा देऊन दुकान उघडण्यास सांगितले. मात्र, दुकानदारांकडून नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. बाजार पेठेत होणारी गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा उडत असलेला फज्जा यामुळे धोक्याची शक्यता वर्तविली जात आहे.

क्वारंटाइनचे शिक्के असतानाही फिरणाऱ्यांवर कारवाई करा

पुण्या, मुंबईसह परगावावरुन आलेल्या लोकांना होमक्वारटाइनचे आदेश देण्यात आले आहेत. यातील काही जणांच्या हातांवर क्वारंटाइनचे शिक्केदेखील मारण्यात आलेले आहेत. मात्र क्वारटाईनचे शिक्के असतानाही काही जण विनाकारण घराबाहेर पडत आहेत. बाजारपेठांमधून फिरत आहेत. त्यामुळे अशा लोकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

मुख्याधिकारी दहा दिवस रजेवर

बाजारपेठ सुरु करताना नगरपंचायत प्रशासनाकडून व्यापाऱ्यांसाठी काही नियम घालून दिले आहेत. मात्र तरीही व्यापारी नियम मोडत आहेत. त्यामुळे याबाबत मुख्याधिकारी अमोल पवार यांच्याशी नागरिकांनी संपर्क साधला असता, मी दहा दिवसांच्या रजेवर आहे, मुख्याधिकारी पदाचा चार्ज सध्या वाईच्या मुख्याधिकारी यांच्याकडे असून त्यांच्याशी संपर्क साधण्याचे सांगितले जात आहे. करोनासारख्या भीषण संकटात मुख्याधिकाऱ्यांनी दहा दिवसांची रजा घेतल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.