पोलीस महासंचालक जयस्वाल यांची घोषणा
पुणे – राज्य पोलीस दलातील पोलीस शिपायांपासून वरिष्ठ आधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या पदोन्नतीच्या प्रत्येक टप्यावर यापुढील काळात खास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पुणे, नाशिक आणि खंडाळा येथील केंद्रात पोलिसांना पदोन्नती दिल्यानंतर त्यांच्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी मंगळवारी केली.
पाषाण येथील पोलीस संशोधन केंद्रात महाराष्ट्र पोलीस जर्नल अंकाचे प्रकाशन जायस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, बिनतारी संदेश विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक रितेश कुमार, सीआयडीचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण साळुंखे आदी उपस्थित होते.
या प्रसंगी दिवंगत पोलीस महासंचालक भास्करराव मिसर लिखित “प्रतिबंधक कार्यवाही’, पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम लिखित “ए गाईड ऑन डॉक्युमेंटस् फ्रॉड इन्व्हिस्टेगशन’, पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे लिखित “भावनिक प्रज्ञावंत पोलीस’, पोलीस निरीक्षक गिरीशा निंबाळकर लिखित “इम्पोर्टंट केस लॉज ऑफ सुप्रीम कोर्ट’, सहायक फौजदार दंडगवाळ लिखित “मुंबई पोलीस दलाचा इतिहास’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
जयस्वाल म्हणाले, पोलीस शिपायांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांना सेवा कालावधीत पदोन्नती देण्यात येते. पदोन्नती देण्यात आल्यानंतर त्यांची कार्यपद्धती तसेच कार्यशैलीत बदल करणे गरजेचे आहे. दरम्यान, या प्रशिक्षण वर्गाचा कालावधी दहा ते बारा दिवसांचा असून पुण्यातील पोलीस संशोधन केंद्र त्यासाठी सहकार्य करणार आहे.