जखमी प्राणी-पक्ष्यांना हाताळण्यासाठी प्रशिक्षण देणार

पुणे: तारेत अडकून जखमी झालेला पक्षी, वाहनाच्या धडकेत जखमी झालेले कुत्रा अथवा मांजर किंवा घरात आढळलेले वन्यप्राणी अनेकदा आपण पाहतो. जखमी अवस्थेत विव्हळणारे, भीतीने भेदरले प्राणी-पक्षी पाहून त्यांना मदत करण्याची अनेकांना इच्छा असते. मात्र, या प्राण्यांना नेमके हाताळायचे कसे? याची माहिती आपल्याला नसते. परंतु आता नागरिकांना या समस्येचे समाधान लवकरच मिळणार आहे. अडचणीत असलेल्या प्राणी-पक्षींना हाताळण्यासाठी वनविभाग विशेष प्रशिक्षण देणार आहे. हे प्रशिक्षण वनविभाग आणि रेस्क्‍यू चॅरिटेबल फाउंडेशन ट्रस्ट यांनी संयुक्तपणे दिले जाणार आहे.

या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात वनविभाग अणि अग्निशमन दलाचे काही कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले जात आहे. विविध आपत्तीप्रसंगी हे कर्मचारी बचाव कार्यात सहभागी होतात. त्यामुळे त्यांन प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. मात्र, अशा परिस्थितीत प्रथम प्रतिसादकर्ता (फर्स्ट रिस्पॉन्डर) म्हणून स्थानिक नागरिकांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळेच सर्वसामान्य नागरिकांनाही प्राणी-पक्षी हाताळण्यासंदर्भातील प्रशिक्षण देणे महत्त्वाचे ठरेल. त्यामुळेच विभागातर्फे हा उपक्रम राबविण्यात येणार असून, या उपक्रमात स्वंयप्रेरणेने सामील होऊ पाहणाऱ्या नागरिकांनी वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन उपवनसंरक्षक ए. श्रीलक्ष्मी यांनी केले आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी शिक्षणाची कोणतीही अट असणार नाही. मात्र प्राणी-पक्ष्यांसाठी मनापासून काम करणाऱ्या नागरिकांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असेही त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.