मुंबई – बॉलिवूडचा नवाब अभिनेता सैफ अली खानचा आगामी चित्रपट ‘लाल कप्तान’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सैफ नागा साधूंच्या रूपात दिसणार आहे. त्याचा हा अनोखा लूक पाहून चित्रपटाची उत्सुकता निर्माण झाली आहे. ट्रेलर पाहता कपाळी कुंकवाचा टीळा, काजळ लावलेले डोळे असा अवतार सैफने धारण केलेला पहायला मिळतोय तसेच त्याचा लूक पाहून तो अतिशय रागिट स्वभावाचा दिसून येत आहे.
लाल कप्तान हा चित्रपट येत्या १८ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नवदीप सिंग करत आहेत. तसेच या चित्रपटाची संपूर्ण कथा नागा साधू यांच्या जीवना भोवती फिरताना पाहायला मिळणार आहे. चित्रपटातील सैफची भूमिका ही त्याच्या आता पर्यंतच्या करिअरमधील आव्हानात्मक भूमिका असणार आहे.
दरम्यान, ट्रेलरच्या सुरुवातीला सैफचा आवज ऐकू येतो. सैफ घोड्यावर बसून एका व्यक्तीचा मृतदेह संपूर्ण गावभर फिरवताना दिसत आहे, आणि थरकाप उडवणारा डायलॉग सैफ बोलत आहे. या चित्रपटात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा पाहुणी कलाकार म्हणून दिसून येणार आहे. तिचा आवाज ट्रेलरमध्ये ऐकू येतो. ‘भोले के सिपाही नही भूत होते है’ असे सोनाक्षी म्हणत आहे. सैफचा चित्रपटातील हा लूक आणि अभिनय चाहत्यांच्या पसंतीला उतरला आहे. चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
त्यामुळे चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. ‘सैफ हा खूप चांगला कलाकार आहे आणि या चित्रपटातील भूमिकेतून सैफच्या अभिनयातील एक नवा पैलू पाहायला मिळणार आहे’ असे चित्रपट निर्माते सुनिल लुल्ला यांनी सांगितले आहे.