गजा मारणेवरील कारवाई म्हणजे ‘ट्रेलर’ : पोलीस आयुक्‍त

 गुंडांविरोधात मुलाहिजा न बाळगता कारवाई करणार

पुणे – ‘कायदा आणि सुव्यस्थेला बाधा तसेच नागरिकांमध्ये दहशत करणाऱ्या गुंडांविरोधात यापुढील काळात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. गजा मारणेवर केलेली कारवाई म्हणजे ट्रेलरच आहे. त्यामुळे या पुढील काळात सामान्यांना त्रास देणाऱ्या गुंडांविरोधात कोणताही मुलाहिजा न बाळगता कारवाई केली जाणार आहे,’ असा इशारा पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला.

तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर गुंड गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांनी द्रुतगती मार्गावर धुडगूस घातल्यानंतर खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी मंगळवारी रात्री मारणेसह त्याच्या आठ साथीदारांना अटक केली. तसेच त्याच्या 200 साथीदारांविरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले. “नागरिकांच्या रक्षणासाठी पोलीस आहेत. मी नागरिकांना उत्तर देण्यास बांधील आहे. सामान्यांना त्रास देणाऱ्या गुंडांविरोधात कडक कारवाईची मोहीम यापुढील काळात तीव्र करण्यात येणार आहे.

तळोजा कारागृहातून बाहेर पडलेल्या गजा मारणेला मंगळवारी कोथरूड पोलीस ठाण्यात आणून त्याला अटक करण्यात आली. अशा प्रकारची कारवाई होईल, याची कल्पना मारणेला नव्हती. या कारवाईतून गुंडांनी धडा घ्यावा,’ असे पोलीस आयुक्‍त म्हणाले.

कारागृह आवारात मिरवणूक निघालीच कशी?
तळोजा कारागृहातून गजा मारणे याची सुटका करण्यात आली. त्याच्या स्वागताला कारागृहाबाहेर हजारो समर्थक आले होते. यावेळी कारागृहाच्या आवारात मारणेची मिरवणूक काढण्यात आली. यानंतर प्रसारमाध्यमांनी हा मुद्दा उचलून धरल्यानंतर पोलीस प्रशासनाला जाग आली आहे. कुख्यात गुंड गजा मारणे याची कारागृह आवारात मिरवणूक निघालीच कशी? याची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे कारागृह महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी दिले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.