Congo Boat Accident: डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो येथे कांगो नदीत एक भीषण जहाज दुर्घटना घडली आहे. लाकडी बोटीला आग लागल्याने ती उलटली. या हृदयद्रावक दुर्घटनेत किमान 148 जणांचा मृत्यू झाला आहे, तर शेकडो लोक बेपत्ता आहेत. दुर्घटनेसाठी ओव्हरलोडिंग आणि अपुरी सुरक्षा व्यवस्था कारणीभूत ठरली आहे.
नावेत आग, प्रवाशांमध्ये गोंधळ –
स्थानिक वृत्तवाहिन्यांच्या माहितीनुसार, ही दुर्घटना देशाच्या वायव्य भागातील कांगो नदीत घडली. मटनकुमु बंदरावरून बोलोम्बा क्षेत्राकडे जाणाऱ्या ‘एचबी कोंगोलो’ या नावेत सुमारे 500 प्रवासी होते, ज्यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. नावेत एका महिलेने जेवण बनवताना चूल पेटवली, त्यातून निघालेल्या ठिणगीमुळे संपूर्ण नावेने पेट घेतला. आगीमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला.
ओव्हरलोडिंग ठरली घातक –
कांगोमध्ये अशा दुर्घटना वारंवार घडतात. याचे प्रमुख कारण आहे जुनाट लाकडी बोटी आणि त्यात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी व सामानाची वाहतूक. या बोटी गावांमधील मुख्य वाहतूक साधन असल्या, तरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्या अत्यंत असुरक्षित आहेत. या दुर्घटनेतही ओव्हरलोडिंगमुळे नौका नियंत्रणाबाहेर गेली.
148 मृत्यू, अनेक बेपत्ता
स्थानिक प्रशासनाने सांगितले की, दुर्घटनेनंतर सैकडो लोक बेपत्ता आहेत. सुरुवातीला मृतांचा आकडा 50 सांगितला गेला, परंतु नंतर तो 148 पर्यंत वाढला. बचाव कार्य सुरू आहे, परंतु अनेकांचा शोध लागलेला नाही.
वाचलेल्यांना तात्पुरता आश्रय
सुमारे 100 जणांना जिवंत वाचवण्यात यश आले असून, त्यांना स्थानिक टाउन हॉलमध्ये तात्पुरता आश्रय देण्यात आला आहे. आगीत भाजलेल्या प्रवाशांना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. नदी आयुक्त कॉम्पीटेंट लोयोको यांनी सांगितले की, आग लागल्यानंतर अनेक प्रवाशांनी घाबरून नदीत उड्या मारल्या. परंतु, पोहता न येणाऱ्या अनेक महिला आणि मुलांचा गटांगळ्या खात मृत्यू झाला, ज्यामुळे मृतांचा आकडा वाढला.
दरवर्षी पुनरावृत्ती –
कांगोमध्ये अशा दुर्घटना सातत्याने घडतात, परंतु सुरक्षिततेच्या उपाययोजनांच्या अभावामुळे हा त्रास थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. दरवर्षी शेकडो लोक अशा बोट दुर्घटनांना बळी पडतात. या हादरविणाऱ्या घटनेने पुन्हा एकदा कांगोतील जलवाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.