वाहतुकीचा “उच्चभ्रू’ धिंगाणा!

कोरेगाव पार्क-कल्याणीनगर रस्ता : मुंढवा मार्गावरही ताण

वाहतूक पोलिसांची गस्त फक्‍त वसुलीपुरतीच : ‘वीकेन्ड’ला तर मध्यरात्रीपर्यंत मुख्य रस्त्यांवर हैदोस

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – एखाद्या रस्त्याचे नियोजन कसे नसावे, असा जर प्रश्‍न कोणी विचारला तर आपसूकच उच्चभ्रू वस्ती समजला जाणारा कोरेगाव पार्क-कल्याणीनगर चौक-मुंढवा या रस्त्याचे नाव समोर येईल. दोन्ही बाजूंनी फुटपाथ, दुपदरी रस्ता असूनही येथे वारंवार वाहतूक कोंडी होते. तर, वाहनांना शिस्त लावण्याऐवजी पोलीस मात्र वसुली करण्यापुरतीच गस्त घालत असल्याचे दिसून येते. यामुळे मात्र सामान्य पुणेकर मात्र वैतागले आहेत.

“पब आणि हुक्का कल्चर’चा जाच

कोरेगाव पार्क परिसरात गेल्या काही वर्षांत सुरू झालेल्या “पब कल्चर’चा नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वाहतुकीपासून अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. “वीकेन्ड’ला रात्री 12-1 वाजतादेखील या रस्त्यावर वाहतूक कोंडी असते. पबमध्ये येणाऱ्यांपैकी सर्वाधिक संख्या आयटीयन्स आणि उच्चभ्रू कुटूंबातील तरुण-तरुणींची आहे. त्यांची चारचाकी वाहने रस्त्यावर अस्ताव्यस्त उभी असतात. त्यांच्यावर पोलीस अधिकारी कोणतीही कारवाई करत नाहीत. त्यामुळे वाहतूक कोंडी होते.

“मॅनहोल’ उचकलेलेच

बंड गार्डनकडून जाणारा रस्ता संपताच कोरेगाव पार्क परिसरात प्रवेश केला, की तुमचे स्वागत उचकलेल्या “मॅनहोल’नी होते. यामुळे अनेकदा किरकोळ अपघातदेखील होतात. काही ठिकाणची “मॅनहोल्स’ खचलेली आहेत. त्यामुळे कल्याणीनगरकडे जाताना वाहने थेट “खड्ड्यात’ जातात. यामुळे अनेकांना पाठीचे आजारदेखील होत आहेत. पण, या “मॅनहोल’ दुरुस्तीकडे महापालिका लक्ष देत नसल्याचे दिसून येते.

सुरक्षित वाहतूक होणार कशी?

कोरेगाव पार्क परिसरात प्रामुख्याने उच्चवर्गीय सोसायट्या आहेत. या गल्ल्यांना लेन ए, बी, सी, डी अशी नावे आहेत. पण, या लेनमध्ये जाताना किंवा येताना सिग्नल किंवा गतिरोधक बांधण्यात आलेले नाहीत. त्यामुळे वळणावरून अंदाज घेऊन वाहने चालवावी लागतात. रात्रीच्या सुमारास येथे अनेकदा अपघातदेखील झाले आहेत. पण, या किरकोळ समस्येवर उपाय काढण्यात कोणालाही रस नाही.

फुटपाथ नेमके कोणासाठी?

या भागात प्रामुख्याने आयटी कंपन्या आणि इतर कॉर्पोरेट उद्योगांची कार्यालये आहेत. त्यामुळे दररोज सकाळ-सायंकाळ नव्हे, तर दिवसातील 8 ते 9 तास सतत वाहतूक असते. त्यामुळे कोंडी होणार, हे निश्‍चित. अनेक महाभाग आपली वाहने फुटपाथवरच उभी करतात. त्यामुळे पादचाऱ्यांना फुटपाथच शिल्लक राहत नाहीत. त्यांना या कोंडीतूनच मार्ग शोधावा लागतो. पण, मग हे फुटपाथ नेमके कोणासाठी? याचे उत्तर ना महापालिका ना पोलिसांना सापडले आहे.

कचरा हस्तांतरण केंद्र रस्त्यावरच

कोरेगाव पार्क मार्गावर आधीच वाहतूक कोंडीचा जाच असताना त्यात महापालिकेचे कचरा हस्तांतरण केंद्र मुख्य रस्त्यालगतच आहे. त्यामुळे कचरा संकलन वाहने येथे खोळंबलेली असतात. शिवाय विशेषत: पावसाळ्यात या कचऱ्याची दुर्गंधी सुटते. याचे सोयर ना प्रशासनाला आहे ना लोकप्रतिनिधींना. जर, या रस्त्याचा विस्तार करायचा असेल, तर तातडीने ही कचरा हस्तांतरण केंद्राची जागा हलविणे आवश्‍यक आहे.

अतिक्रमणांची संख्या वाढली

कोरेगाव पार्कमध्ये प्रवेश करताच फुटपाथवर उदंड अतिक्रमणे झाल्याचे दिसून येते. विशेषत: कापड, चप्पल आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांची या मार्गावर रेलचेल असते. काही ठिकाणी तर, टपरीवाल्यांनी हक्‍काची जागा मिळविली आहे. जवळच असलेल्या बाबा-बुवांच्या आश्रमामुळे परदेशी नागरिकांचीही जा-ये येथे असते. त्यामुळे ते या वस्तू रस्त्यावर खरेदी करतानाही दिसतात. गेल्या अनेक वर्षांपासून येथे राजरोसपणे हा व्यवसाय सुरू असल्याचे ते सांगतात.

मुंढवा-हडपसर मार्गावरही सेम-टू-सेम

कोरेगाव पार्क आणि कल्याणीनगर परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीचा फटका पुढे मुंढवा परिसराला बसत आहे. मुंढवा मुख्य चौक ते मुंढवा गाव चौकापर्यंत तासन्‌ तास वाहतूक कोंडी झालेली असते. यावर गेल्या पाच वर्षांत कोणालाही उपाय शोधता आलेला नाही. फक्‍त निवडणूक काळात भुयारी मार्ग बांधण्याचे मुद्दे समोर येतात. पण, निवडणूक होताच हा मुद्दा सपशेल गुंडाळला जातो. जर, भुयारी मार्ग झाला तर वाहतूक कोंडीचा निम्मा त्रास कमी होणार आहे.

रस्ता रुंदीकरण बारगळले

कल्याणीनगर येथे जाण्यासाठी असलेल्या पुलालगत रस्ता रुंदीकरण प्रस्ताव वाहतूक पोलिसांनी महापालिकेला दिला आहे. यासंबंधी स्थानिक लोकप्रतिनिधींकडेही पाठपुरावा केला आहे. मात्र, यासंदर्भात कोणतीही कार्यवाही झालेली नाही. हे काम झाले असते, तर जवळपास 60 टक्‍के वाहतूक कोंडी कमी झाली असती, असा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासन आणि नेते किती जागृत आहेत, असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे.

कोरेगाव पार्क नॉर्थ मेन परिसरात सर्वाधिक होते. पूर्वी हा परिसर निवासी होता. पण, तो पूर्णपणे कमर्शियल झाला आहे. येथे हॉटेल्स असल्याने वीकेन्डला प्रचंड गर्दी होते. यातच या रस्त्याची क्षमता खूपच कमी आहे. यामुळे कोंडी झाली, नाही तरी वाहतूक संथ असते. पूर्वी येथे एकाच शिफ्टमध्ये वाहतूक कर्मचारी असायचे. ऐन कोंडीच्या वेळी त्यांची कार्यक्षमता कमी व्हायची. परंतु, सध्या आम्ही दोन शिफ्टमध्ये कर्मचारी नेमले आहेत. नाईटसाठी 5 कर्मचारी तैनात आहेत. तसेच एका क्रेनची सुविधादेखील आहे. यामुळे वाहतूक कोंडी अथवा अपघात झाल्यास तातडीने कार्यवाही करण्यात येते.
– सुचेता खोकले, वाहतूक निरीक्षक, कोरेगाव पार्क.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)