“फोटो टॅगिंग’ असणारा देशातील पहिलाच प्रकल्प
दिवसभरात हजारो नागरिक करतात संकेतस्थळाचा उपयोग
“ई-चलन’सह कारवाईचा तपशीलही “अपलोड’
पुणे – नागरिकांना शहरांतर्गत प्रवास करणे सोपे जावे, या हेतूने “ट्रॅफ वॉच’ या संकेतस्थळाची निर्मिती शहर वाहतूक विभाग, चेंजभाई, स्मार्ट सिटी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यांच्या संकल्पनेतून करण्यात आली आहे. याद्वारे नागरिकांना सुमारे 1 लाख 38 हजार फोटोंद्वारे रस्त्यांची दैनंदिन परिस्थिती एका क्लिकवर मिळत आहे. “फोटो टॅगिंग’ असणारा देशातील हा पहिला प्रकल्प आहे.
मागील काही महिन्यांत उद्भवलेल्या पूरजन्य स्थितीमध्ये सुमारे 30 लाखांहून अधिक वेळा “ट्रॅफवॉच’चा उपयोग झाला. तर पालखीसाठी तयार करण्यात आलेल्या “पेज’ला साडेचार लाखांहून अधिक “हिट्स’ मिळाले. यासह संकेतस्थळाचा उपयोग दिवसभरांत हजारो नागरिक करत आहेत.
नागरिकांना ज्या परिसरामध्ये जायचे आहे, त्यांनी इंटरनेटवर “पुणे ट्रॅफवॉच’ असे नाव टाकून संकेतस्थळ सुरू करावे. त्यानंतर अपेक्षित चौकाचे नाव “टाइप’ केल्यानंतर त्या परिसरातील “लाईव्ह ट्रॅफिक’ पाहता येणार आहे. यासह “सिग्नल’, “झेब्रा क्रॉसिंग’, सम-विषम पार्किंग, “साइनबोर्ड’, “ब्लॅक स्पॉट’, “नो-एन्ट्री’, “नो-पार्किंग’ आदीसह संबंधित परिसरांत वाहतूक विभागाने केलेल्या कारवाईचा तपशिल पाहता येणार आहेत. यांसह वारंवार त्रास सहन कराव्या लागणाऱ्या गोष्टी यामध्ये समाविष्ट केल्या आहेत, वाहतूक नियमांचे उल्लंघन होणारे चौक, पाणी साचणारी ठिकाणे, बेकायदा लावलेले बॅनर आदी बाबींचा यामध्ये समावेश आहे.
नागरिकांनो, सहभाग नोंदवा
दै. “प्रभात’च्या “वाहतूक’ विषयाच्या “विशेष मालिके’मध्ये पुणेकरांना सहभाग नोंदवता येणार आहे. पुण्यातील वाहतूक परिस्थितीबाबत संस्थांनी त्यांचा तयार केलेला विशेष अहवालदेखील पाठवता येणार आहे. reporterprabhat30@gmail.com ई-मेलवर पुणेकरांनी सहभाग नोंदवून आपल्या प्रतिक्रिया पाठवाव्यात.
नागरिकांना “मार्गदर्शका’प्रमाणे “ट्रॅफवॉच’चा उपयोग होतो. हे संकेतस्थळ सर्वांनाच उपयुक्त आहे. या संकेतस्थळावर “ई-चलना’सह कारवाईचा तपशिलदेखील “अपलोड’ करण्यात येत आहे. “पुणे ट्रॅफवॉच’वर “रिअल टाइम अपडेट’ असल्याने नागरिकांसाठी ही संकल्पना फायदेशीर ठरणार आहे.
– पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त, वाहतूक