व्यावसायिक वाहतूकदारांना दरवाढीचा ‘शॉक’

कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतून प्रवास करणाऱ्या वाहनांना


10 ते 50 रुपये ज्यादा मोजावे लागणार


व्यावसायिकांकडून व्यक्‍त केली जातेय नाराजी


व्यावसायिक वाहतूकदार करवाढीमुळे आर्थिक कोंडीत


बोर्डाचे उत्पन्न साडेपाच कोटींनी वाढणार

पुणे – कॅन्टोन्मेंट बोर्डतर्फे त्यांच्या हद्दीतून प्रवास करणाऱ्या व्यावसायिक वाहनांवर वाढीव कर आकारण्यास मंगळवारपासून प्रारंभ केला आहे. वाढीव करानुसार वाहनचालकांना 10 ते 50 रुपये ज्यादा भरावे लागणार असून, करवाढीमुळे बोर्डाचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा प्रशासनाने व्यक्‍त केली.

कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे सप्टेंबर 2019मध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत वाहनकरात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे निविदा प्रक्रिया रखडल्याने करवाढीची अंमलबजावणी करता आली नाही. बोर्डाच्या जानेवारी 2020मध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत निविदा मंजूर करून मंगळवारपासून प्रत्यक्ष कर आकारणीला सुरुवात झाली आहे.

प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस, मोटारी तसेच मालवाहतूक करणाऱ्या रिक्षा, टेम्पो, ट्रक यांसारख्या व्यावसायिक वाहनांकडून आकारण्यात येणारा कर वाढल्याने व्यावसायिकांकडून नाराजी व्यक्‍त केली जात आहे, तर या करवाढीमुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या बोर्डाचे उत्पन्न साडेपाच कोटींनी वाढेल, असा विश्‍वास बोर्ड प्रशासनाने व्यक्त केला.

कॅन्टोन्मेंट कायदा 2006 मधील कलम 66 मध्ये करसंकलनाच्या व्याख्येनुसार, कॅन्टोन्मेंट हद्दीत प्रवेश करणाऱ्या व्यावसायिक वाहनांवर या कराची आकारणी केली जाते. त्यासाठी बोर्डात 13 ठिकाणी करसंकलन केंद्र उभारण्यात आली आहेत. या करात दर पाच वर्षांनी वाढ करण्याच्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकारानुसार कर आकारणी केली जाणार आहे. यापूर्वी, सन 2009-10 मध्ये बोर्डाने वाहन प्रवेश कर वाढविला होता. त्यानंतर गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये सर्वसाधारण सभेने या करात वाढ करण्याचा निर्णय घेतला, असे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.