पुणे – मेट्रोच्या कामामुळे शिवाजीनगर एसटी स्थानक वाकडेवाडी येथे स्थलांतरित केले आहे. मात्र, वाकडेवाडी स्थानकाच्या प्रवेशद्वारावर वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच, या ठिकाणी वाहतूक पोलीस कारवाई करण्याच्या नावाखाली स्थानकाबाहेर “अर्थाजन’ करत असल्याची परिसरात चर्चा आहे.
शिवाजीनगर स्थानकाचे स्थलांतर झाल्यापासून एसटीचे संपूर्ण संचलन वाकडेवाडीतून सुरू झाले आहे. मात्र, एसटी स्थानक रिक्षाचालकांच्या चक्रव्युवहात अडकले आहे. स्थानकाबाहेरील मुख्य रस्त्यावरून पिंपरी-चिंचवडला जाणारी वाहने व त्या ठिकाणाहून पुण्यात येणाऱ्या वाहनांमुळे वर्दळ असते. तसेच, स्थानकाच्या प्रवेशद्वारावर अरुंद जागा असून एकच एसटी बस बाहेर जाण्याएवढी जागा आहे. त्याच ठिकाणावरून स्थानकात अनधिकृतपणे रिक्षा प्रवेश करताना दिसून येतात. त्यामुळे प्रवेशद्वारावर एसटी चालकांना अडथळा निर्माण होत असल्याने बसचालक व रिक्षाचालकांमध्ये वादावादीचे प्रकार घडत आहेत.
यूटर्न, कारवाई शून्य
शिवाजीनगर भागातून जाताना एसटी स्थानक अथवा पुन्हा शिवाजीनगरला जाण्यासाठी स्थानकासमोरील सिंग्नल चौकातून यु टर्न बंद केला आहे. मात्र, वाहतूक पोलिसांसमोरच रिक्षाचालक व खासगी वाहनचालक यु टर्न घेत स्थानकातून येणाऱ्या एसटी बसला अडथळा करत आहेत. तरीही पोलिसांकडून केवळ बघ्याची भूमिका घेतली जाते.
चुकीच्या पद्धतीने डांबरीकरण केल्याने अपघात
एसटी स्थानकाबाहेर पीएमपी बससाठी पदपथावर बसथांबा केला आहे. थांब्यासमोर चुकीच्या पद्धतीने डांबरीकरण केल्याने प्रवाशांना बसमध्ये चढताना व उतरताना अपघात होत आहे. सोमवारी दुपारच्या सुमारासही एक तरुण निगडी-मनपा बसमध्ये चढताना डांबरावरून पाय घसरून पडल्याची घटना घडली. मात्र, बसचालकाने अचानक ब्रेक लावल्याने तरुण बचावला.