दखल: वाहतुकीचे नियम व पुणेकर!

शशिकांत दिघे

पुणे फार पूर्वी सांस्कृतिक, शैक्षणिक शहर होते. नगरसेवक कर्तव्यदक्ष होते; सद्‍रक्षणार्थ होते. पण आता “जाऊ तेथे खाऊ’ भ्रष्ट प्रवृत्ती, बेरोजगार, सुशिक्षिततेचा अभाव चुकीचे करण्यात आनंद, यामुळे शहर तर बकाल केलेच, पण वाहतूक समस्या जटील केली. पोलीस तरी काय करणार. या सुशिक्षित असलेल्या पण अशिक्षितपणे वागणाऱ्याला पोलिसांचा दबाव हवा, जरब हवी. पोलीस वाहतूक नियंत्रित करण्याकडेच लक्ष देणारे हवेत. (सध्या झाडाखाली किंवा मोटार सायकलवर बसलेले दिसतात.) पोलिसांचे या वागण्याने पोलीस ब्रीदला “सद्‍रक्षणार्थ’ला धक्‍का बसतोय.

पुणेकर खरोखरीच सुशिक्षित आहेत का? यावर प्रश्‍नचिन्ह आहे. सिग्नल तोडणे, वनवेचा गैरवापर करणे, झेब्रा क्रॉसिंगवर वाहने उभी करणे, क्षमतेपेक्षा जास्त व्यक्‍तीसह प्रवास करणे, अशा प्रकाराला सुशिक्षित (?) म्हणविणाऱ्या पुणेकरांनी राजरोस प्राधान्य दिले आहे. वाहतूक नियमांचे वारंवार उल्लंघन केले जात आहे. पुणे शहराला शैक्षणिक विद्वत्तेचे शहर मानले जाते. आपल्या विद्वत्तेचा वापर ते स्वतःच्या व इतरांच्या भल्याकरिता करताना दिसतात का? पादचारी मार्गावर वाहने उभी करणे, दुचाकीवर दोनऐवजी तीन-चार व्यक्‍तींसह प्रवास करणे, सिग्नल तोडणे, अवैध वाहतूक रिक्षा, शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या रिक्षांतील लहान बालकांची कोंबाकोंबी हा सुसंस्कृतपणा आहे का? पुणे शहरातील वाहतूक बेशिस्त आहे, यावर शिक्‍कामोर्तब अनेक राज्यांतील, परदेशांतील नागरिकांनी केले आहे.

दररोज वर्तमानपत्रांत किमान एखाद्या तरी अपघाताचे वृत्त येते. त्यात मरणाऱ्याची काही चूक नसते. वाहतुकीचे नियम मोडून बेफाम वाहन चालविणे, कोणतीही सूचना न देता वाहन ओव्हरटेक करणे, रस्त्यावर वाहन उभे करताना, रस्त्याच्या कडेला उभे न करता वाहतुकीला अडथळा होईल असे वाहन उभे करणे, यामुळे अपघात घडत आहेत व पुण्यातील ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले यांचे जीव जात आहे.

अपघात झाला की त्याचा दोष मग पोलिसांना. त्यांच्या गाड्यांची मोडतोड, रास्तारोको वगैरे हिंसात्मक प्रकार जे सध्याच्या राजकारणात राजकीय पक्षांचे विधायक (?) कार्य होऊन बसले आहे. “दोन मिनिटांची घाई, कोणाचा तरी जीव घेई’ असा प्रकार सिग्नल तोडल्याने, ओव्हरटेक केल्याने होत आहे; पण हे सुशिक्षित पुणेकरांना का समजत नाही?

पुणे शहरातील बेशिस्त वाहतुकीस पोलीस, वाहनचालक, पादचारी हे सर्वच जबाबदार आहेत. पोलीस निरनिराळ्या योजना आखतात. चक्राकार वाहतूक, कोठे प्रवेश बंद, कोठे एकेरी वाहतूक, परंतु त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता पोलिसांची संख्या कमी. आवश्‍यक सामग्रीचा अभाव यामुळे होत नाही. काही वर्षांपूर्वी शहरातून सतत पोलीस-वाहनातून रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांना हटविण्याचे, पादचारी मार्गावर वाहन असल्यास, चौकातील वाहतूक पोलिसांना संबंधित दुचाकी, रिक्षा, चारचाकी वाहनांचा नंबर सांगून खटला भरण्याचे आदेश दिले जात होते. सदर वाहन शहराच्या सर्व भागांत फिरून, वारंवार सचना देऊन वेळप्रसंगी बेशिस्त वाहनावर खटला भरण्याचेही कार्य करीत होते. या वाहनावर स्वच्छ पांढरा ड्रेस परिधान केलेले, शरीराला थोडा बाक आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे कर्तव्य पुणेकरांचा कौतुकाचा विषय झाला होता. त्यावेळी पादचाऱ्यांना फुटपाथचा वापर करण्याची सूचना दिली जात होती. आज मात्र तसे काही दिसत नाही. सर्वच चौकांत निवांत, सावलीत गप्पांत रमणारे पोलीस कर्मचारी दिसतात.

शहरातील वाहतुकीला शिस्त नाही, वाहनचालकांवर पोलिसांचा वचक नाही, रस्त्याच्या एका कोपऱ्यात पोलिसांच्या वाहनावर बसून वाहतुकीचे नियोजन, नियम मोडणारांवर लक्ष, शक्‍य आहे का? पोलिसाची वाहनचालकावर बारीक नजर असण्याकरिता पोलिसांनीच चौकात चक्राकार काम केले पाहिजे. चौकाचौकात नेमणूक करणाऱ्या किमान एका कर्मचाऱ्याकडे मिनी लाऊडस्पीकर देण्यात यावा व वाहनावर वाहतुकीचे नियम न पाळल्यास होणाऱ्या दंडाची कल्पना द्यावी. जास्तीत जास्त तीन वेळा वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांकडून दंड वसूल करावा. त्यानंतर वाहन परवाना एक वर्ष स्थगित ठेवावा. विनापरवानगी वाहन चालविले तर जबर दंड करावा. शहरात आज अनेक तरुण-तरुणी दुचाकीवर तीन-चारजण बसून पोलिसांसमोरून जातात. अनेक वाहनचालक पत्नी, दोन मुले असे चौघेजण जातात. शाळकरी रिक्षात पंधरा-वीस मुले कोंबून त्यांची दप्तरे बाहेर लोंबकळत असतात, त्यामुळे अपघात होतात. का नाही पोलीस कडक कारवाई करीत, का नाही परवाना रद्द करीत, का नाही वाहन जप्त करीत.

सध्या पुण्यात पोलीस राबवत असलेले अनेक प्रयोग पोलिसांच्या दुर्लक्षपणामुळे फसले आहेत. “एकेरी वाहतूक’ फलक, “नो पार्किंग’ फलक नाही. लक्ष्मी रोडवरील डाव्या बाजूस वाहने उभी करण्यास बंदी आहे; पण प्रत्यक्षात खरेदीला येणारे चारचाकी वाहनाचे चालक दुकानांसमोर उभे राहतात. त्यांच्यावर कारवाई होत नाही.

वाहतूक शाखेच्या पोलीस उपआयुक्‍तांनी सबइन्स्पेक्‍टर त्यांच्या विभागांत दिवसातून चार-पाच वेळा राऊंड घेऊन कर्मचारी ड्युटी व्यवस्थित करीत आहे का, याची खात्री करावी. नियम मोडणारे, चारचाकी वाहनचालक, दुचाकी वाहनचालक दिसले, अवैध वाहतूक करणारे, रिक्षात जादा लोंबणारी दप्तरे घेऊन विद्यार्थ्यांना नेणाऱ्या रिक्षांवर कारवाई करावी. तसेच पोलीस उपआयुक्‍त-वाहतूक यांनी अचानक तपासणी करावी. यामुळे बेशिस्त पुणेकर वाहनचालकांवर वचक बसून, या शहरातील वाहतूक “दी बेस्ट’ आहे, असे बाहेरून शहरात येणारे म्हणतील. पुणे पोलिसांनी बेशिस्तपणाबाबत जी आकडेवारी दिली ती धक्‍कादायक आहे. या आकडेवारीबरोबर पोलिसांनी वसूल केलेल्या दंडाची रक्‍कम पाहता, सुशिक्षित पुणेकर दंड भरतात पण वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. 2016 च्या जुलै महिन्यापर्यंत पोलिसांनी जवळजवळ 2 कोटी 50 लाख रुपये दंडरूपाने वसूल केले आहेत. दंड वसुली म्हणजे वाहतुकीचे सक्षमीकरण नव्हे, हे ध्यानात घेणे गरजेचे आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.