पुणे : आधीच वाहतूक पोलिसांबद्दल नागरिकांच्या मनात रोष आहे. कधी कधी ते आपल्या कर्तृत्वाने तो खरा ठरवत असतात. वाहतुकीचे नियोजन सोडून केवळ दंडात्मक कारवाईचे लक्ष्य गाठण्यासाठी घोळक्याने उभे असलेले पोलीस बघून कोंडीत घुसमटलेले नागरिक आणखी संतप्त होत आहेत. असाच काहीचा प्रकार शनिवारी सायंकाळी विद्यापीठ चौकातही बघायला मिळाला.
मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे विद्यापीठ चौकातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. त्यामुळे तेथे सातत्याने कोंडी होताना दिसत आहे. येथे नियोजनासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक पोलिसही तैनात करण्यात आले आहेत. मात्र, ते त्यांच्या सवयीप्रमाणे नियोजन सोडून एक गठ्ठा चौकाच्या पुढे उभे राहात वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करत अडवणूक करत असल्याने येथील कोंडी सोडविणार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विद्यापीठ चौकात मेट्रोचे पिलर टाकण्याचे काम मागील दोन महिन्यांपासून सुरू आहे. यासाठी वाहतूक मोठ्या प्रमाणात पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. कार्यालयीन वेळेत मात्र पर्यायी मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. यातच मेट्रोच्या पिलरचे काम जसजसे पुढे सरकत आहे, तसतसे पुढील भागात तात्पुरता वाहतूक बदल केला जात आहे. मात्र, सर्वच रस्ते विद्यापीठ चौकात येऊन मिळत असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात कोंडी होत असलेल्यी पाहायला मिळत असते. यासाठी वाहतूक पोलीस आणि वॉर्डन यांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. मात्र, वाहतूक पोलीस स्वत: तर नियोजन करत नाहीत, उलट वॉर्डनलाही सोबत घेऊन चौकाच्या पुढे एक गठ्ठा थांबत वाहनचालकांना अडवत दंड आकारणी करण्यास प्राधान्य देत आहेत. शनिवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी हेच चित्र विद्यापीठ चौकात दिसत होते.
विद्यापीठ चौकात वाहतूक बदल झाल्यापासून कर्मचारी आणि वॉर्डनला यांची वाहतूक नियोजनासाठी आणि कोंडी फोडण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. ते असा काही प्रकार करत असतील तर त्याची चौकशी केली जाईल
– मीनल सुपे पाटील (पोलीस निरीक्षक, वाहतूक)