पुणे – तोंडाला मास्क न लावता जवळ आलेल्या व्यक्तीला बाजूला हो म्हटले म्हणून वाहतूक पोलिसाला अपशब्द वापरून धक्काबुक्की केल्याप्रकरणी एका तरुणाला वानवडी पोलिसांनी अटक केली. प्रशांत धनराज ढवळे (वय 28, पिंपळे गुरव) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी वानवडी वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी रत्नदीप कदम यांनी फिर्याद दिली. त्यानुसार ढवळे याच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यासह सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल झाला. हा प्रकार बुधवारी रात्री गोळीबार मैदान येथे रात्री आठच्या सुमारास घडला.
फिर्यादी हे गोळीबार मैदान येथे वाहतूक नियमनाचे काम करत होते. त्यावेळी आरोपी ढवळे हा तोंडाला मास्क न लावता “मला गाडी पकडून दे’ असे फिर्यादींना म्हणाला. तोंडाला मास्क नसल्यामुळे फिर्यादींनी त्याला तेथून निघून जाण्यास सांगितले. दरम्यान, यावरूनच आरोपी हा फिर्यादींना अपशब्द वापरून धक्काबुक्की करू लागला.
हा प्रकार तेथून जाणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यानी आरोपीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनादेखील आरोपीने शिवीगाळ करत अंगावर धावून जात धक्काबुक्की केली. त्यामुळे आरोपीला कारवाईसाठी पोलीस ठाण्यात घेऊन येत असताना वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जगताप करीत आहेत.