पेट्रोल पंपामुळे वाहतूक “गॅस’वर

दापोडी-फुगेवाडी दरम्यान वाहनांच्या रांगा
पुणे-मुंबई महामार्गावर रोजचेच चित्र
संगीता पाचंगे
पिंपळे गुरव – पुणे-मुंबई महामार्गालगतच्या दापोडीतील पेट्रोल पंपामुळे महामार्गावर दररोज वाहतूक कोंडी होत आहे. दोन्ही बाजूने सिग्नल, मेट्रोचे सुरु असलेले काम आणि एका बाजूला उड्डाणपुलासाठीचे वळण यामुळे या वाहतूक कोंडीवर तोडगा काढणे अशक्‍य झाले आहे.

दापोडी येथील पुणे-मुंबई महामार्गालगत हा पेट्रोल पंप नव्याने उभारण्यात आला आहे. एका बाजूला दापोडी चौकातील सिग्नल तर दुसऱ्या बाजूला फुगेवाडीचा सिग्नल यामध्येच हा पंप आहे. दोन्ही सिग्नलमधील अंतर एक किलोमीटरपेक्षाही कमी आहे. त्यातच मेट्रोच्या कामामुळे मध्य भागातील रस्ता व्यापला गेला आहे. पुणे-मुंबई, पुणे-नाशिकसह दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. या पेट्रोल पंपाच्या शेजारीच फुगेवाडी व दापोडीला जोडणारा पूल आहे. यामुळे रस्त्यावर वाहने चालविताना कसरत करावी लागत असतानाच पेट्रोल पंपात इंधन भरण्यासाठी येणाऱ्या वाहनांच्या रांगा महामार्गावर लागलेल्या असतात.

कमी जागेत हा पेट्रोल पंप आहे. याठिकाणी दुचाकींसह महामार्गावरुन धावणाऱ्या छोट्या-मोठ्या वाहनांची गर्दी असते. त्यातच रिक्षा व अन्य खासगी वाहने महामार्गालगत उभी केलेली असतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. सकाळी व सायंकाळच्या वेळी वाहनांच्या महामार्गावर रांगा लागतात. शालेय विद्यार्थी तसेच नोकरदार वर्गाला तासन्‌तास वाहतूक कोंडीमध्ये अडकून रहावे लागते. रुग्णवाहिकांना देखील यातून वाट काढता येत नाही. सध्या पाऊस सुरू असल्याने येथील वाहतूक कोंडीची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. पादचारी मार्गावर वाहने उभी केलेली असतात. रस्त्यावरही वाहनांची कोंडी असल्याने पादचाऱ्यांना चालायलाही जागा राहत नाही.

इतर वेळी हेल्मेट सक्ती व अन्य कारणामुळे सर्वसामान्य वाहन चालकांवर कारवाई होते. हा नाही तर तो नियम दाखवून त्यांची पावती फाडली जाते. मात्र, दररोजची वाहतूक कोंडी होवूनही वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या पेट्रोल पंप चालकासह, येथे महामार्गालगत व पादचारी मार्गावर वाहने उभे करणाऱ्यांवर कारवाई का होत नाही, असा सवाल नागरिक करीत आहेत. सिग्नलच्या जवळ पंपाला मान्यता कोणत्या नियमाने दिली गेली, असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत.
राजू मरियन यांचे पेट्रोल पंपालगत दुकान आहे. पेट्रोल पंपामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा फटका आपल्या व्यवसायाला बसत असल्याचे मरियन यांनी सांगितले. तर या पेट्रोल पंपासह महामार्गालगत वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रवी कांबळे यांनी केली.

सुरुवातीपासूनच या पेट्रोल पंपाला विरोध होत होता. चुकीच्या ठिकाणी हा पंप उभारला गेल्याने वाहतुकीची समस्या उद्‌भवली आहे. याठिकाणी सिग्नल व उड्डाणपुलासाठी वळण असल्याने अपघात होत आहेत. सर्वसामान्यांवर कारवाई करणारे वाहतूक पोलीस कारवाई का करीत नाहीत, हा मोठा प्रश्‍न आहे. याविरोधात अनेकदा निवेदने दिली. मात्र, कोणीही दखल घेतली नाही. महापालिका आणि वाहतूक पोलीस एखादा बळी जाण्याची वाट पाहत आहे का, असा प्रश्‍न पडतो.

– राजू बनसोडे, स्थानिक नगरसेवक.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.