पिंपरी, (प्रतिनिधी) – काळेवाडी मुख्य रस्त्यावरील पीएमपी बसथांब्यासमोर सिमेंटचे पाइप टाकण्यात आले आहेत. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण झाला असून वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. महापालिकेने तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
काळेवाडी ते पिंपरी रस्त्यावरील पवना नदी पुल ते छत्रपती शिवाजी महाराज (एमएम) चौक दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला सांडपाणी वाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे.
पवना नदी पुल ते आठवण हॉटेलपर्यंत हे काम काही प्रमाण पुर्ण होत आहे. मात्र, आठवण हॉटेल ते एमएम चौक पर्यंत हे काम बाकी आहे. त्यासाठी लागणारे पाइप रस्त्यावर आणून टाकले आहेत.
बसथांब्यासमोर टाकलेल्या या पाइपमुळे प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते. तसेच त्याचा रहदारीस अडथळा निर्माण होत आहे.
या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून त्यात पाइप टाकल्याने अजूनच रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे सायंकाळी मोठ्या वाहतूक कोंडी होते. मोठी वाहने आल्यास वाहतूक मोठ्या प्रमाणात मंदावत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.