नाणे मावळातील वीस गावांची वाहतूक ठप्प

नाणे रोड पाण्याखाली ः संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

नियोजन अभावाचा नागरिकांना फटका
दोन वर्षे लोटली तरीही पुणे-मुंबई महामार्गावरील उड्डाणपूल अपूर्ण व धोकादायक अवस्थेत आहेत. तर नाणे रोडवरील इंद्रायणी नदीवरील नवीन बांधण्यात आलेल्या पुलाची उंची भरपूर असूनही नागरिकांना पावसाळ्यात पुराच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. हा पूल उंच आहे परंतु, नदीपात्रात पाणीपातळी वाढल्यानंतर या पुलाचा भराव पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण करतो. परिणामी रोडवर नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात साचते. यामुळे पावसाळ्यात दरवर्षी वाहतूक पुर्णपणे ठप्प होते. पुलाचे काम नियोजनपूर्वक न झाल्याने वीस गावांतील नागरिकांना दरवर्षी या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने या समस्येवर लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी दुग्ध व्यावसायिक शेखर शिंदे, वामन नाणेकर, संदीप नाणेकर, अनिल कटके, दत्तात्रय गायकवाड आदींनी केली आहे.

नाणे मावळ – नाणे मावळात पावसाची संततधार सुरु आहे. वडीवळे पुलावरून पाणी वाहू लागल्याने त्यामुळे वडीवळे, वळक, मुंढावरे, सांगिसे, वेल्हवळी, खांडशी, बुधवडी, नेसावे व उंबरवाडी या गावांचा संपर्क तुटला आहे. तर वडीवळे धरणातून 4748 क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कामशेत-नाणे रोड वरील इंद्रायणी नदीवरील जुना पूल पाण्याखाली गेल्याने वीस गावांची वाहतूक ठप्प झाली आहे. तर नाणेमधील स्मशानभूमी पाण्याखाली गेल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत.

गेल्या पंधरवड्यात नाणे मावळ व परिसरात सतत चालू असलेल्या पावसामुळे वडीवळे प्रकल्पाच्या पाणी साठ्यात जलद गतीने वाढ झाली आहे. सध्या धरण 78.15 टक्के भरले आहे. धरण क्षेत्रात पावसाची तीव्रता जास्त असल्याने धरणाच्या दरवाजा वरून दोन फुटवरून पाणी धरणातून बाहेर पडत आहे. त्यामुळे सध्या वडीवळे धरणातून 4748 क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे, अशी माहिती वडीवळे प्रकल्पातील पाटबंधारे विभागाचे अधिकारी मनोहर खाडे यांनी दिली.
वडीवळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कामशेत-नाणे रोड वरील इंद्रायणी नदीवरील जुना पूल पाण्याखाली गेला आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने रस्त्यावर पाणी साचून नाणे मावळातील नाणे, नवीन उकसान, नाणोली, साई, वाऊंड, कचरेवाडी, कांबरे, करंजगाव, मोरमारेवाडी, कोंडीवडे, गोवित्री, पाले, उकसान, वडवली, वळवंती, भाजगाव, कोळवाडी, सोमवडी, थोरण व जांभवली या गावांचा संपर्क तुटला आहे.

शाळकरी मुले, कामगार व दुग्ध व्यावसायिकांना वाहतूक बंदचा मोठा फटका बसला आहे. महत्त्वाची कामे रखडल्याने अनेकांनी जीव धोक्‍यात घालून प्रवास केला. पुलाच्या त्रुटीयुक्त कामामुळे नाणे येथील दशक्रिया विधी स्मशानभूमीत होवू शकला नाही. अनेकांच्या गाड्या बंद पडल्या. नाणे मावळच्या ग्रामीण भागातील जाणारा हा एक महत्त्वपूर्ण मार्ग असल्याने शहरी भागातून येणाऱ्या शिक्षक व शिक्षिकांना रस्त्यावर पाणी साचल्याने शाळांकडे जाता न आल्याने या गावातील शाळांना सुट्टी जाहीर करावी लागली.

नाणे रोडवरील इंद्रायणी नदीवरचा पूल हा नियोजनशून्य पद्धतीने बांधण्यात आला आहे. परिणामी पावसाळ्यात गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे. अनेक गावांचा संपर्क तुटत असून येथील व्यवहार अनेक दिवस ठप्प राहत आहेत.

– वसंत काळे, माजी सरपंच तथा शहराध्यक्ष, भाजप, कामशेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×