पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – हिंजवडी येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शुक्रवारी या परिसराची पाहणी केली.
यानंतर या परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरुपी दूर करण्यासाठी रस्त्यांचे रुंदीकरण करणे, आवश्यक त्या ठिकाणी उड्डाणपूल उभारणे, वाहतूक मार्गात बदल आदींचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.
हिंजवडी, माण, मारुंजी गावच्या हद्दीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून तीन टप्प्यांमध्ये राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान विकसित करण्यात आले आहे.
जागतिक पातळीवर त्याची आयटी हब म्हणून वेगळी ओळख निर्माण झाली आहे. येथील कंपन्यांना उद्योग सुलभ वातावरण देण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे.
त्यामुळे पीएमआरडीए, पीसीएमसी, एमआयडीसी, पीडब्ल्यूडी आदी शासकीय यंत्रणांनी उद्योजकांना भेडसावणाऱ्या अडचणींचे समन्वयाने आणि तातडीने निराकरण करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी बुधवारी दिल्या होत्या.
तसेच सर्व विभागांनी संबंधित सर्व यंत्रणांच्या प्रमुखांनी विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली येत्या शुक्रवारी या भागाची पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार विभागीय आयुक्त आणि इतर विभागाच्या अधिकार्यांनी आज भेट देऊन हिंजवडी परिसराची पाहणी करून वाहतूक कोंडीच्या समस्येवर चर्चा केली.