पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरीतील जयहिंद शाळेसमोर दुपारी बारा ते एक वाजताच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. याबाबत महापालिका व पोलीस प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत असते.
शहरातील अनेक शाळांनी विद्यार्थ्यांकरिता बसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र ही सुविधा महाग असल्याने अनेक पालक रिक्षा किंवा इतर वाहनांचा पर्याय निवडतात. तसेच काही पालक स्वतः आपल्या वाहनातून विद्यार्थ्यांना शाळेत आणून सोडतात. सकाळच्या सत्रात भरणारी शाळा दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान सुटते.
तसेच दुपारच्या सत्रातील शाळा साडेबारा वाजताच्या सुमारास भरते. त्यामुळे या दोन्ही सत्रातील विद्यार्थी आणि पालक एकाचवेळी शाळेसमोर येतात. यामुळे दुपारी बारा ते एक वाजताच्या दरम्यान या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी हो असते. तसेच पायी जाणार्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो.
या परिसरात पिंपरी चिंचवड महापालिकेचे जिजामाता रुग्णालय असून येथील बाह्य रुग्ण विभागाची वेळही दुपारी बारा वाजेपर्यंत असल्याने रुग्णांचा परिसरात मोठ्या प्रमाणात राबता असतो. तसेच स्टेट बँक, रेल्वे स्थानक रस्ता, इतर शाळा, महाविद्यालय या परिसरात असल्याने दिवस भर वर्दळ असते.
मात्र येथील वाहतूक कोंडीबाबत कोणतीही ठोस उपाय योजना केल्याचे दिसून येत नाही. यामुळे महापालिका, लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासनाने याबाबत उपाययोजना करून स्थानिक नागरिकांची यातून सुटका रावी, अशी मागणी होत आहे.