औंध परिसरात ट्रॅफिक जॅम

रस्त्यांवर लागल्या वाहनांच्या रांगा : चालकांना झाला मनस्ताप

औंध – औंध परिसरातील बहुसंख्य रस्त्यांवर शनिवारी दुपारच्या वेळेस संततधार सुरू असलेल्या पावसामुळे वाहतूक कोंडी झाली होती. यामध्ये प्रामुख्याने परिहार चौक, ब्रेमेन चौक तसेच औंधमधील प्रमुख सर्व रस्त्यांना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी अरुंद रस्ते तर काही ठिकाणी रस्त्यांची कामे चालू तसेच रस्त्यांवरील खड्डे यामुळे वाहतुकीत कोंडीत भर पडली.

शनिवार सुट्टी असल्यामुळे वेस्टन मॉल परिसरात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. या परिसरात वेस्टन मॉल, रिलायन्स मॉल असे मोठे मॉल्स आहेत. तसेच प्रसिद्ध हॉटेल्सही आहेत. त्यामुळे सुट्टीनिमित्त व खरेदीसाठी नागरिक या भागांमध्ये गर्दी करतात. त्यात या परिसरातील रस्ते अरुंद असल्यामुळे या भागांमध्ये मॉलमध्ये येणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात रिघ लागली होती. परिहार चौक ते ब्रेमेन चौक परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्पामुळे झालेल्या छोट्या रस्त्यांमुळे ही वाहतूक कोंडीत भर पडत असल्याचे दिसून येत आहे. औंध परिसरातील अनेक ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामामुळे ही वाहतूक कोंडीमध्ये भर पडत असल्याचे लक्षात येत आहे.

तरीही स्मार्ट सिटीच्या नावाखाली चालू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करावेत, अशी मागणी नागरिक करत आहेत. तसेच औंध परिसरात मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी ही नागरिकांना नित्याचे झाली आहे. त्यामुळे ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत व पर्यायी मार्ग तयार करावेत, अशी मागणी नागरिक करत आहेत. कारण वाहतूक कोंडीमुळे नागरिक व वाहनचालकांना नाहक त्रास सहन होतो आणि वेळही फुकट जातो, असे त्यांचे म्हणणे आहे.

उपाययोजना करावी
औंध परिसरातील अनेक ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामामुळे वाहतूक कोंडीमध्ये भर पडत आहे. त्याच त्रास वाहनचालक व नागरिकांना होत असून वाहतूक कोंडीवर उपाययोजना करावी, अशी नागरिक व वाहनचालकांची मागणी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.