वारंवार होतेय वाहतुक कोंडी; जुन्या पुलाची दुरुस्ती आवश्यक
कोल्हार खुर्द – राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील नगर – मनमाड रस्त्यावर प्रवरा नदीवरील जुना पुल यापूर्वी नादुरुस्त असल्यामुळे बंद आहे. त्यामुळे सहाजिकच नव्या पुलावर ताण पडला आहे. या नव्या पुलावरून चारचाकी वाहनांसह अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे पुलाच्या दक्षिणेला रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यामुळे वाहनांची गती मंदावली असून परिणामी वाहतूकीचा बोजवारा उडाला आहे. तासन् तास वाहनांच्या रांगा या पुलावर लागत असल्याने या रस्त्याने प्रवास करणे कंटाळवाणे झाले आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे धार्मिक स्थळे असलेल्या शिर्डी आणि शिंगणापूर या दोन स्थळांना जोडणारा महत्वाचा दुवा असलेला राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील प्रवरा नदीवर नवीन आणि जुना असे दोन पुल आहेत. देशभरातून येणाऱ्या साई आणि शनिभक्तांना या कोल्हार खुर्द येथील प्रवरा नदीवर असलेल्या पुलावरून मार्गक्रमण करावे लागते. शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन करून शिंगणापूरला जाण्यासाठी निघालेल्या भक्तांना याच पुलावरून जात असताना एक ना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
गेल्या सात ते आठ वर्षांपासून या रस्त्याने प्रवास करणे अवघड होत चालले आहे. नवा पुल वाहतूकीसाठी खुला झाल्यानंतर जुना पुल बंद करण्यात आला. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक आता या पुलावरून होत आहे. परिणाम या पुलावर वाहतूकीचा ताण पडला आहे. त्यातून पुलावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने वाहनांना गती मिळणे अवघड झाले. या रस्त्याने लोकप्रतिनिधी ये-जा करतात. पण त्यांचे कोणाचे याकडे लक्ष नसल्याने या वाहतूकीमुळे प्रवाशी वैतागले.
नवीन पुलावरून अवजड वाहतूकीसह शनिभक्त, साईभक्त, तसेच इतर प्रकारची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. एकाच पुलावरून दोन्ही बाजूची वाहतूक सुरू असल्यामुळे पुलावर कोल्हार खुर्दच्या बाजूने मोठ्या प्रमाणात गुडघाभर खड्डे पडले आहेत. त्यामुळे छोट्या मोठ्या वाहनांचा खोळंबा झाल्यास काही क्षणात पुलाच्या दोन्ही बाजूस असलेल्या कोल्हार खुर्द आणि कोल्हार बुद्रुक या दोन्ही गावांमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक कोंडी होते. त्यामुळे दोन्ही गावच्या ग्रामस्थांसह साई आणि शनिभक्तांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो.
त्यातच पुलावरून दक्षिणेकडे नगर हे जिल्ह्याचे ठिकाण, तसेच मोठे – मोठे रुग्णालय आणि उत्तरेकडे शिर्डीचे सुपर हॉस्पिटल, लोणीचे प्रवरा मेडिकल ट्रस्ट हॉस्पिटल असे मोठमोठे दवाखाने असल्याने या पुलावरून दररोज किमान चार ते पाच रुग्णवाहिका देखील रुग्णांना घेऊन जात येत असतात. त्यांना देखील या पुलावर अडकून पडावे लागत आहे. त्यामुळे जुन्या पुलाची दुरूस्ती करून तो पुल वाहतूकीसाठी खुला करण्याची मागणी होत आहे. हा पुल दुरुस्त झाला तर नव्या पुलावरील वाहतूकीचा ताण कमी होईल.