पुणे – भररस्त्यात बस बंद पडल्याचा अनुभव नागरिकांनी घेतला आहे. मात्र, शुक्रवारी टिळक रस्त्यावरील माडीवाले कॉलनीच्या चौकात सकाळी गर्दीवेळी खड्ड्यात ट्रक अडकला होता. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. बऱ्याच प्रयत्नांनंतर क्रेनच्या सहाय्याने तो बाहेर काढण्यात आला.
माडीवाले कॉलनीच्या चौकात मागील काही दिवसांपासून विकासकामे सुरू आहेत. यामुळे तेथे सिग्नलजवळ रस्ता खोदला आहे; तर मुख्य टिळक रस्त्यावर खोदकाम केले आहे. मात्र, ते काम पूर्ण न बुजवल्याने खड्ड्यात ट्रक अडकला. या रस्त्याने हलकी वाहने आणि बसेस ये-जा करत होती.
मात्र, खडीचे वजन अधिक असल्याने हा ट्रक खड्ड्यात अडकला. यापूर्वीदेखील येथील खोदकामामुळे गंभीर अपघाताची शक्यता होती. सुदैवाने वाहनचालकांच्या प्रसंगावधानाने हा धोका टळल्याचे स्थानिकांनी सांगितले.
वाहतूक पोलिसांनी सुमारे तासाभराने क्रेन सहाय्याने हा ट्रक बाजूला केला. शुक्रवार पेठ आणि सणस मैदानाकडून येणारे रस्ते या चौकात टिळक रस्त्याला येऊन मिळतात. याशिवाय, या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या बसेसची संख्या अधिक असते.
त्यामुळे वाहनांची रहदारी, अपुरा रस्ता आणि रस्त्याच्या मध्यभागीच अडकलेल्या ट्रकमुळे वाहतूक कोंडीत भर पडली होती. ही कोंडी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी फोडली. मात्र, वाहनचालकांना वेढा मारून जावे लागत होते. वाहनांच्या रांगा पाहून अनेक वाहनचालकांनी “यु-टर्न’ घेत, अन्य मार्ग निवडला होता.